विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:45 AM2019-04-25T05:45:21+5:302019-04-25T05:45:50+5:30
देशासाठी मतदान करण्याचे आवाहन; मोदींनी लष्कराला निर्णय स्वातंत्र्य दिल्याचा दावा
मुंबई : देशाला अंतर्गत खिळखिळे करण्याचा प्रयत्न शेजारील देशाकडून होत असताना त्यांना भारतीय सेनेची ताकद काय असते, याची जाणीव नरेंद्र मोदींनी करून दिली आहे. उरी व पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला मोदींनी धडा शिकवला आहे. असे असताना काँग्रेस मात्र जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक केवळ विकासाची नसून, विकासासोबत राष्ट्रीय सुरक्षिततेची आहे. त्यामुळे मुंबईकरांनी देशासाठी मतदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उत्तर मध्य मतदारसंघातील भाजप उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारार्थ कुर्ला येथील शिवाजी मैदानामध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसवर व राहुल गांधींवर सडकून टीका केली. २००८चा दहशतवादी हल्ला असो की पाकची इतर आगळीक, तत्कालीन पंतप्रधान कणखर नसल्याने योग्य प्रत्युत्तर देण्यात आले नाही. मोदींनी मात्र लष्कराला निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले व पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. मुंबईत सध्या प्रति माणसी सव्वा लाख रुपये विविध प्रकल्प उभारणीवर खर्च होत आहेत. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्या पाव पटदेखील खर्च केला नाही. मुंबईत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना धक्के खावे लागणार नाहीत. मुंबईचे चित्र बदलण्याचे काम आपल्या सरकारने केल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबईत एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्यात येणार असून मेट्रो, रेल्वे, मोनो, बस व जलप्रवास एकाच तिकिटावर करता येईल असा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. विमानतळ परिसरातील झोपडीधारकांना आचारसंहितेनंतर व पावसाळ्यापूर्वी नवीन घराच्या चाव्या देण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्र्यांनी महाजन यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार विनायक राऊत, लीलाधर डाके, आमदार आशिष शेलार, मंगेश कुडाळकर, पराग आळवणी, संजय पोतनीस, आर. एन. सिंह, सुधाकर देशमुख, तृप्ती सावंत, अविनाश महातेकर उपस्थित होते.
‘काँग्रेसचा जाहीरनामा, उधारीचा मामला’
काँग्रेसला पराभवाची खात्री वाटत असल्याने ते काहीही आश्वासन देत आहेत. राहुल गांधींच्या पणजोबा, आजी, वडील व आईला सत्तेची संधी दिली; मात्र जनतेची गरिबी हटली नाही. केवळ त्यांच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची गरिबी हटल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस नेत्यांना झोपेतदेखील मोदी दिसतात. त्यांचे जाहीरनामे, भाषणे सर्व उधारीचा मामला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
‘वडिलांच्या नावाची ढाल नव्हे, तर विकासकामांची तलवार’
पूनम महाजन म्हणाल्या, वडिलांच्या नावाची ढाल नव्हे, तर मी विकासकामांची तलवार घेऊन लढाई लढत आहे. माजी खासदाराचा १० वर्षांतील विकासाचा अनुशेष भरून काढल्याचा दावा महाजन यांनी केला.