दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारती पवार, की महाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 06:52 AM2019-01-31T06:52:24+5:302019-01-31T06:52:43+5:30
भाजपाकडून जागा खेचण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज
- श्याम बागूल
दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपाने आपला वरचष्मा कायम ठेवला असला तरी, गेल्या वेळी मोदी लाटेमुळे जागा कायम राखण्यात यशस्वी झालेले हरिश्चंद्र चव्हाण यांची यंदाच्या निवडणुकीत मात्र दमछाक होण्याची शक्यता आहे. हॅट्ट्रिक साधलेल्या चव्हाण यांना आजवर सेनेचे चांगले बळ मिळाले; परंतु यंदा युती होते की नाही यावरच चव्हाण यांचे भवितव्य अवलंबून आहे.
पूर्वीच्या मालेगाव व सध्याच्या दिंंडोरी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना, भाजपा व माकप प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादीचे बळ अधिक असल्याने यंदा जागा खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी आपली सर्व ताकद पणाला लावत असून, त्यातूनच दिंडोरीचे सेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आपल्या ताकदीत भर घातली आहे. राज्यात भाजपाविरोधात महाआघाडी करण्याचे प्रयत्न सुरू असताना दिंडोरीच्या जागेवर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात होऊ घातलेल्या विरोधकांच्या आघाडीत जे काही जागा वाटप होईल त्यातील हक्काची जागा म्हणून माकप दिंडोरी लोकसभेच्या जागेकडे पाहत आहे. या जागेसाठी माकपचे कळवणचे विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांनी दावा सांगितला असून त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे.
वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी काढलेला नाशिक ते मुंबई ‘लॉँग मार्च’ व त्यातून आदिवासी भागातील जनतेला वाटप करण्यात आलेल्या वनदाव्यांचा विचार करता त्याच बळावर गावित निवडणूक लढवू इच्छित आहेत. माकपाच्या या या दाव्यामुळे राष्ट्रवादीत बैचेनी वाढली आहे. गेल्या निवडणुकीत चव्हाण यांच्याशी चांगली लढत देणाऱ्या राष्टÑवादीच्या डॉ. भारती पवार या यंदाही उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, माकपने सांगितलेला दावा तसेच धनराज महाले यांच्या पक्ष प्रवेशाने डॉ. पवार यांची धाकधूक व अस्वस्थता वाढली आहे.
कळवण, सुरगाणा या भागांवर गेली अनेक वर्षे आपले प्रभुत्व कायम ठेवणारे स्व. अर्जुन तुळशीराम पवार यांच्या स्नुषा असलेल्या डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबीयातच कलह आहे. अशा परिस्थितीत कौटुंबिक कलहातून जागा गमविण्यास राष्टÑवादी तयार नाही. त्यामुळे महाले यांना उमेदवारी दिली जावू शकते. मात्र, महाले यांना काँग्रेस आणि माकपची साथ लाभणार का, यावर बरेच काही अवलंबून आहे.
एकूण मतदार- 1502035
पुरुष- 792095
महिला- 709940
सध्याची परिस्थिती
विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केल्याने त्यांनी मतदारसंघावर चांगली पकड ठेवली आहे. मात्र अॅन्टी इन्कबन्सीचा त्यांना सामना करावा लागेल.
गेल्या पंधरा वर्षांत आदिवासी व शेतकºयांचे प्रश्न कायम राहिल्याची मतदारांची भावना. भाजपाने केलेल्या कथित सर्वेक्षणात चव्हाण यांची उमेदवारी धोकेदायक.
माकपने मतदारसंघावर दावा सांगितल्यामुळे राष्टÑवादीपुढे पेच; कॉँग्रेसकडूनही दिंडोरी लोकसभेची जागा मिळावी असा ठराव.
सेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्या प्रवेशाने राष्टÑवादीला बळ; मात्र महाले यांना उमेदवारी मिळाल्यास डॉ. भारती पवार यांच्या भूमिकेवर विजयाचे गणित अवलंबून.
भाजपा-सेना युती झाल्यास दिंडोरी लोकसभेची जागा भाजपासाठी सुटेल, असे गृहीत धरून माजी आमदार धनराज महाले यांनी स्वत:साठी लोकसभेचा मार्ग मोकळा करून घेण्यासाठी राष्टÑवादीत प्रवेश केला आहे.
२०१४ मध्ये मिळालेली मते
हरिश्चंद्र चव्हाण (भाजपा )- ५,४२,७८४
डॉ. भारती पवार (राष्ट्रवादी)- २,९५,१६५
हेमंत वाघमारे (माकप)- ७२,५९९
शरद माळी (बसप)- १७,७२४
ज्ञानेश्वर माळी (आप)- ४,०६७