राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंपाठोपाठ राज्यातील आणखी एका खासदाराचं अमित शहांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 05:41 PM2021-03-15T17:41:23+5:302021-03-15T19:19:50+5:30
Navneet Rana demands president rule in Maharashtra: खासदार नवनीत कौर राणा यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. राणा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा उल्लेख केला आहे. (mp navneet rana demands president rule in Maharashtra)
मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली. त्यानंतर कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत ठाण्यातल्या रेतीबंदर परिसरात आढळून आला. या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख राणा यांनी पत्रात केला आहे. 'अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ही कार मनसुख हिरेन यांची होती. ही कार चोरीला गेल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात केली होती. तीच कार अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्यासह सापडली होती,' असं राणा यांनी पत्रात लिहिलं आहे.
या संपूर्ण प्रकरणात हिरेन यांची चौकशी करण्यात आली होती. ते चौकशीला सहकार्य करत होते. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात होती. त्याबाबत हिरेन यांनी ठाकरे सरकारकडे तक्रारही केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणीदेखील केली होती. मात्र त्यानंतर हिरेन यांचा मृत्यू झाला, असा संपूर्ण घटनाक्रम नवनीत राणा यांनी पत्रात नमूद केला आहे.
राज्यात सगळेच असुरक्षित; राष्ट्रपती राजवट लागू करा
अंबानी हे देशातील मोठे उद्योगपती आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचं योगदान मोठं आहे. देशातील हजारो तरुणांना ते रोजगार देतात. एवढ्या मोठ्या उद्योगपतीला धमकी मिळते. त्यावरून उद्योगपतींसह सामान्य लोकांचं रक्षण करण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे द्यावा आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणा यांनी केली आहे.