"एकनाथ खडसेंविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने, ते ईडीला घाबरत नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 02:36 PM2021-07-09T14:36:13+5:302021-07-09T14:37:06+5:30
Nawab Malik : यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपाचा गैरसमज आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.
मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची चौकशी ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने सुरु आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. तसेच, एकनाथ खडसे हे चौकशीला सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केले नाही, त्यामुळे ते घाबरत नाहीत, असे नवाब मलिक म्हणाले.
नवाब मलिक यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे, त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचे खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
याचबरोबर, ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केले नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत. यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपाचा गैरसमज आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.
...हे भाजपाचे काम
यंत्रणांचा दुरुपयोग करणे हे भाजपाचे काम आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश असेल तिथे विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम या यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगिलते.
ईडीकडून एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत. ईडीने समन्स बजावल्यानंतर एकनाथ खडसे गुरुवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल नऊ तासांनंतर खडसे ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. आम्ही ईडीला सर्वप्रकारे सहकार्य केले, ईडीने मागितलेली सर्व कागदपत्र दिली, काही कागदपत्र देण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितल्याची माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी दिली. तसेच चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ खडसे यांनी दिल्याचेही वकिलांनी सांगितले.