‘त्या’ विधानावर राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया; राज ठाकरे यांना बहुतेक...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 03:43 PM2021-08-13T15:43:51+5:302021-08-13T15:44:05+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला.
मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यात आली असून, राज ठाकरे यांनी वाचन वाढवावे, असा खोचक सल्ला देण्यात आला आहे. (nawab malik replied raj thackeray over criticism statement on ncp)
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज ठाकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील विधानाचा समाचार घेत प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी वाचन वाढवण्याचा सल्ला देत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
“५० वर्षांच्या कारकिर्दीत विरोधकांचे असे कृत्य पाहिलेय का?, शरद पवारांनीच आत्मपरीक्षण करावे!”
हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे
या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहिती नसावे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहिती नसावे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
“ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”
दरम्यान, राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्याला जाती-पातींमध्ये खितपत ठेवायचे का आपण? पूर्वी फक्त नावे विचारल्यानंतर तुम्ही कुणापैकी असे विचारायचे. म्हणजे तुझी जात कोणती? पण हे फक्त तिथपर्यंतच होते. पण आता अगदी शाळेपर्यंत हे उतरलेय, असेही राज ठाकरे म्हणाले.