नवाब मलिकांचा इशारा; भाजपा आमदार अतुल भातखळकर अन् प्रसाद लाड यांचं पितळ उघडं पाडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 04:52 PM2021-04-20T16:52:18+5:302021-04-20T16:54:15+5:30
भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. गेल्या पाच दिवसात भाजपाने सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
मुंबई – रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून राज्यात सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याने विरोधकांवर गंभीर आरोप लावले. त्यानंतर या प्रकरणात एका फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला सोडवण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकरांनी रात्री पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणात आमदार प्रसाद लाड आणि अतुल भातखळकरांनी नवाब मलिकांवर जोरदार टीका केली होती. त्यावरून नवाब मलिकांनी या दोन्ही आमदारांना इशारा दिला आहे.(NCP Nawab Malik Warning to BJP Prasad lad and Atul Bhatkhalkar)
नवाब मलिक म्हणाले की, माझा राजीनामा मागताय, पोलीस ठाण्यात तक्रार देताय, महामहिम राज्यपालांकडे जाताय..या देशात मोदी नावाचा कायदा आलाय का? त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांकडे देण्यात आले आहेत का? मोदी कायदा आला असेल आणि अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल यांच्याकडे असेल तर त्याची माहिती द्यावी अशी मागणी करतानाच मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच असा स्पष्ट शब्दात त्यांनी विरोधकांना फटकारलं आहे.
भाजपाकडून सरकारवर आणि वैयक्तिक वारंवार होणाऱ्या टिकेला आज नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिलेच शिवाय येणाऱ्या काळात भाजपाच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचं ते म्हणाले. आजच्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपच्या माजी आमदाराने रेमडेसिवीरचा केलेला काळाबाजार याची माहिती माध्यमांसमोर पुराव्यानिशी मांडली. याचवेळी काही कागदपत्रे आणि व्हिडिओ माध्यमांना दिले.या देशात कोरोनाचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मात्र रेमडेसिवीर मिळत नाही असे चित्र निर्माण झाले. त्याचकाळात भाजपाच्या सुरत येथील कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत असल्याच्या प्रकरणावर आम्ही बोट ठेवले. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिवीर वाटप करण्यास किंवा साठा करण्यास परवानगी दिली नसल्याचा स्पष्ट खुलासा केला होता. त्यादिवसापासून भाजपाचे काही नेते ५० हजार रेमडेसिवीर आणून देऊ असा दावा करत होते असं मलिकांनी सांगितले.
त्याचसोबत माझ्याकडे बोट दाखवत असताना क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगू इच्छितो की, तुमचा कारभार किती क्रिस्टल आहे याचा भांडाफोड आज ना उद्या करणारच, भतीजाचा भाग किती कुणी खाल्ला हेही समोर आणणार आहे. कांदिवली - मालाडचे जे आमदार आहेत ते कुठे रात्री बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याजवळचे लोक ईडीमार्फत तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून काय काय घेतलंय. किती देवाणघेवाण झाली याची माहितीही येणाऱ्या काळात सांगू असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी आमदार प्रसाद लाड आणि अतुल भातखळकर यांना दिला आहे.
दरम्यान नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्हयात काळाबाजार सुरू आहे त्याची संपूर्ण माहिती, फोटो आणि व्हिडिओ देत असून नंदुरबारमध्ये कारवाई सुरू झालीय. इतर दोषींवर कारवाई होईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राज्यात २ लाख ७० हजार कोरोनाची आकडेवारी वाढत आहे त्यामुळे चिंता निर्माण करणारी परिस्थिती आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात, राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ही सत्य परिस्थिती आहे असे असताना भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. गेल्या पाच दिवसात भाजपाने सरकार कामच करत नाही, रेमडेसिवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.