स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार?; राष्ट्रवादीचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 10:57 AM2019-03-21T10:57:30+5:302019-03-21T11:12:31+5:30
सुजय विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीची पोस्टरबाजी
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय धुळवड सुरू झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना गळाला लावण्याचा सपाटा भाजपानं लावला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनंभाजपानं निशाणा साधला. 'ज्यांना आम्ही नाकारलं, त्यांना का गोंजारता?' असा सवाल राष्ट्रवादीनं पोस्टरमधून विचारला आहे. या पोस्टरवर कुठेही भाजपाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी लक्षात घेतल्यास हे पोस्टर कोणासाठी लावण्यात आलं आहे, हे ओळखणं फारसं अवघड नाही.
माढ्यातील राष्ट्रवादीचे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. रणजितसिंह यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील माढ्याचे खासदार आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना हाती कमळ घेतलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीनं भाजपावर पोस्टरमधून निशाणा साधला. 'दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार? स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार?', असे प्रश्न राष्ट्रवादीनं उपस्थित केले आहेत. मुंबईतल्या विविध भागांमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सध्या या पोस्टर्सची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. सोलापूरमधील दिग्गज नेते असलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं पक्षात स्वागत करताना, विजयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंहांना आशीर्वाद दिला आहे. तेदेखील मनानं भाजपामध्ये आले आहेत, असं सूचक विधान केलं. त्याआधी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये सुरू असलेल्या या इनकमिंगवर राष्ट्रवादीनं पोस्टरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.