नक्की या! शरद पवारांचं अमित शहांना 'गोड' निमंत्रण; दोन नेत्यांमधील केमिस्ट्री वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 09:12 AM2021-08-05T09:12:12+5:302021-08-05T09:14:50+5:30
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा पुण्यात येणार
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची परवा दिल्लीत भेट झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी विरोधकांची बैठक बोलावली असताना, त्याच दिवशी पवार शहांच्या भेटीला गेले. आता हे दोन नेते पुन्हा एकदा भेटण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात अमित शहा पुण्यात येत आहेत. शहा त्यांच्या एका नियोजित कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत. याच दौऱ्यात शहांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी असा आग्रह पवारांनी केल्याचं समजतं.
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अमित शहा पुण्यात येणार आहेत. त्यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रमात पुण्यात आहेत. याची कल्पना असल्यानं पवारांनी शहांना जिल्ह्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिलं. त्यावर शहांनी होकार दर्शवला. त्यामुळे पुढील महिन्यात पुन्हा एकदा पवार आणि शहांची भेट होण्याची दाट शक्यता आहे.
गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्ताराआधी सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. त्याची जबाबदारी अमित शहांकडे आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट साखर क्षेत्रातील देशामधील एक प्रमुख संस्था आहे. साखर क्षेत्राचे प्रश्न जाणून घेण्यासाठी इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या, अशा स्वरुपाचं निमंत्रण पवारांनी शहांना दिलं आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीगाठी अनेकदा झाल्या आहेत. गेल्याच महिन्यात दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. मात्र शहा आणि पवार यांची भेट सहसा होत नाही. मात्र दोनच दिवसांपूर्वी सहकार क्षेत्राबद्दल चर्चा करण्यासाठी पवार शहांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर आता पवारांनी शहांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे भेटीगाठींचा सिलसिला सुरू राहण्याची शक्यता आहे.