NCP: “आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चिंता नाही”; नेतृत्वाबद्दल बोलताना शरद पवार असं का म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 04:07 PM2021-06-10T16:07:39+5:302021-06-10T16:09:30+5:30
Sharad Pawar: नुसतं पाच वर्षेच नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करून सामान्य जनतेत प्रभावीपणे देश व राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचं हे सरकार काम करेल याबाबत माझ्या मनात शंका नाही असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या मुख्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपण २२ वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि संघर्षाची भूमिका स्वीकारली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या २२ वर्षांचा आढावा आपण घेतोय असं पवारांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले की, आज एका वेगळ्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं आहे. कधी कुणाला पटलं नसतं की सेना आणि आपण एकत्र काम करू शकू. पण आपण ते केलं. पर्याय दिला आणि सुदैवाने तो पर्याय लोकांनी स्वीकारला. तिन्ही पक्षाच्या लोकांनी या पर्यायाच्या बांधीलकीतून योग्य रीतीने पावलं टाकायला सुरुवात केली. आणि परिणामस्वरूप हे महाविकास आघाडी सरकार उत्तम रीतीने काम करतंय. कुणी काहीही म्हणो, हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे काम करेल. नुसतं पाच वर्षेच नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमाने एकत्रित काम करून सामान्य जनतेत प्रभावीपणे देश व राज्यात प्रतिनिधीत्व करण्याचं हे सरकार काम करेल याबाबत माझ्या मनात शंका नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज एका वेगळ्या विचारांचं सरकार आपण स्थापन केलं आहे. कधी कुणाला पटलं नसतं की सेना आणि आपण एकत्र काम करू शकू. पण आपण ते केलं. पर्याय दिला आणि सुदैवाने तो पर्याय लोकांनी स्वीकारला.#NCP22#NCPFoundationDaypic.twitter.com/cFAr1hjvVi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 10, 2021
तसेच या सर्व संकटाच्या कालखंडात आपण थांबलो नाही, डगमगलो नाही. आपण करोनाला सामोरे गेलो. शेवटच्या माणसापर्यंत अन्नधान्य पोहचेल याची आपण खबरदारी घेतली. सरकारचे कार्यक्रम राबवण्यात आपण सगळे यशस्वी झालो. यापुढे महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असलेली एक पिढी आज राष्ट्रवादीमधून तयार होत आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आपण केले पाहिजे. या नेतृत्वाच्या फळीमागे सामान्य माणूस विश्वासाने उभा राहून त्यांची बांधिलकी कायम टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच मला स्वतःला राष्ट्रवादीच्या भवितव्याविषयी चिंता वाटत नाही. तुमची सत्ता ही अधिक हातांमध्ये गेली पाहिजे. सत्ता ही विक्रेंदित झाली, केवळ एकाच ठिकाणी सत्ता राहिली की ती भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती सत्ता अधिक लोकांच्या हातामध्ये गेली पाहिजे. हे सूत्र आपल्याला मान्य असेल तर एससी, एसटी, ओबीसी या प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे, हे वाटले पाहिजे, ते कृतीत आणण्याची काळजी आपण घेतली पाहिजे असंही शरद पवार म्हणाले.
यापुढे महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असलेली एक पिढी आज राष्ट्रवादीमधून तयार होत आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आपण केले पाहिजे. या नेतृत्वाच्या फळीमागे सामान्य माणूस विश्वासाने उभा राहून त्यांची बांधिलकी कायम टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. pic.twitter.com/ZnkGNleRrm
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 10, 2021
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील उपेक्षित घटकांच्या केवळ पाठीशी उभा राहातो असं नाही तर त्यांच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुपूर्द करून त्यांच्यामार्फत सर्व घटकांचे प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो, या वर्गात नेतृत्वाची फळी तयार करतो, हे चित्र आपण निर्माण करणं आवश्यक आहे. त्यातूनच संबंध देशाला एक नवीन रस्ता दाखवूया असं आवाहनही शरद पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे.