तेव्हा राष्ट्रवादीने एबी फॉर्म आणला होता, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
By हेमंत बावकर | Published: October 25, 2020 05:30 PM2020-10-25T17:30:36+5:302020-10-25T17:32:40+5:30
Eknath khadse News: विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पाडले, असे खडसे म्हणाले.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांना भाजपाने तिकिट नाकारले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या ऐवजी रोहिणी खडसेंना उमेदवारी देण्यात आली. तसेच त्यांना पाडण्यात आले. या साऱ्या घडामोडींवर खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुक्ताईनगरमध्ये आल्यावर खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपात राहिलो असतो तर अडवाणी, वाजपेयींसारखी गत झाली असती. पाटलांना माझा संन्यास हवा होता. मी मार्गदर्शन करावे अशी त्यांची अपेक्षा होती, असे आरोप करतानाच त्यांनी रोहिणी आणि आपल्यात भाजपाने भांडणे लावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पाडले. याचे पुरावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना दिले होते. तरीही कुणावरही पक्षाकडून कारवाई झाली नाही. रोहिणी खडसेंच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या लोकांचे फोटो, व्हिडिओ मी दिले होते. या साऱ्या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते, असा आरोप खडसे यांनी केला.
तसेच जेव्हा भाजपाने तिकिट नाकरले तेव्हाच राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन आले होते. तेव्हाच जर का मी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून उभा राहिलो असतो, तर मी निवडून आलो असतो. मंत्रीही झालो असतो. त्याचदिवशी राष्ट्रवादीकडून उभा राहिलो असतो तर राजकारणाचे चित्र वेगळे राहिले असते, असे खडसे म्हणाले. दरम्यान आज जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात खडसे यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, यावेळी जिल्ह्यातील अनेक नेते अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.