आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो : छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 02:17 PM2021-02-09T14:17:58+5:302021-02-09T14:18:58+5:30
खरे मोदी कोण? भुजबळांनी केला सवाल
"आंदोलनजीवी अशा पद्धनतीने कोणाला हिणवणं योग्य नाही. प्रत्येक लहान सहान गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे. त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो," अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. जनता दरबार उपक्रमाअंतर्गत प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला.
"आंदोलने ही जगभर होत आहेत. या देशाला ही आंदोलने नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी रोज काही ना काही असायचं, कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, रस्त्यातच बस, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली. सभागृहात त्यांनी आंदोलने केली," असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते. मग याव्यतिरिक्त आणखी दुसरं काय करायचं असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.
खरे मोदी कोण?
"आज कुणीतरी मला व्हॉटस्ॲपवर पाठवलं आहे की, मोदी गहिवरलेसुद्धा. त्यामुळे नक्की हे खरे की ते खरे, हे मोदींनाच विचारायला हवे की खरे मोदी कोण? असा खोचक टोला भुजबळ यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना लगावला आहे. "पंतप्रधाननरेंद्र मोदी शरद पवार यांच्यावर टीका पण करतात. यु टर्न केल्याचेही बोलतात आणि युतीसुद्धा करतात," असेही छगन भुजबळ म्हणाले.
काय म्हणाले होते मोदी ?
आंदोलन केल्याशिवाय जगू न शकणारी ‘आंदोलनजीवी’ ही नवी जमात सध्या देशात उदयास आली आहे. या आंदोलनकारी प्रवृत्तींपासून देशाने सावध राहायला हवे, अशी कडक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत केली होती. नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोपही मोदी यांनी केला होता.