"ताईसाहेब, पत्र लिहिण्याऐवजी..."; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 02:17 PM2021-04-16T14:17:27+5:302021-04-16T14:19:37+5:30
आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, मुंडेंचा टोला
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानं परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच कोरोना लसीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण कार्यक्रम ठप्प झालेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोगयमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. तसंच बीडच्या पालकमंत्र्यांचं लक्ष आहे कुठे असा सवालही केला होता. यावर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
"ताई साहेब, मुख्यमंत्र्यांना आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल," असं म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. "जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरीकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच. राजकारण इतरत्र जरूर करा, पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको," असं आवाहनही त्यांनी केलं.
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! @Pankajamunde@DrPritamMunde
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
अचानक आलेल्या जागृतीतून संभ्रम निर्माण होतोय
"बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो," असं म्हणत मुंडे यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला. जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे ६८०० व कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. @DrPritamMundepic.twitter.com/9EjHxh1Rqp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
प्रीतम मुंडेंवरही निशाणा
"अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल," असं म्हणत धनंजय मुंडे यांनी डॉ. प्रीतम मुंडे यांना टोला लगावला. यासोबत त्यांनी एक तक्तादेखील शेअर केला आहे.