शरद पवारांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By जयदीप दाभोळकर | Published: January 14, 2021 03:39 PM2021-01-14T15:39:46+5:302021-01-14T15:41:57+5:30
आरोप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल असं म्हणाले होते शरद पवार
यिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केली होती. "मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल," असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
"मी माझी भूमिका मांडली आहे. आता निर्णय हा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील," अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. शरद पवार यांच्या आदेशाप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या जनता दरबारासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे यावर भाजपा नेते गिरीश महाजन यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असं ते म्हणाले.
काय म्हणाले होते पवार?
"धनंजय मुंडेंनी काल माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची बाजू सविस्तर मांडली. त्यांचा काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध आला. आता त्याबद्दल पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणावरून व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले होणार याची बहुधा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच न्यायालयात गेले. त्यामुळे न्यायालयाच्या विषयावर मी बोलणार नाही,' असं शरद पवार यांनी सांगितलं.
"धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, विचारविनियम झाल्यावर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल," असं पवार म्हणाले होते.