मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असतं, तो पंजाही मारू शकतो; भुजबळ यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 04:53 PM2021-06-11T16:53:33+5:302021-06-11T16:58:08+5:30
आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते, चंद्रकांत पाटील यांनीही यापूर्वी केलं होतं असं वक्तव्य. उद्धव ठाकरे, पंतप्रधान भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना आलं उधाण.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलं होतं. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीदेखील वाघाशी कुणाची मैत्री होत नाही, मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असल्याचं म्हणत प्रत्युत्तर दिलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.
"राज्याच्या अनेक प्रश्नांचे उत्तर केंद्राकडे आहे. त्यामुळे जमवून घ्यावे लागते. मैत्री कोणाशी करायची हे वाघाच्या मनावर असते, वाघ पंजाही मारू शकतो," असं सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चेच्या संदर्भात बोलताना भुजबळ यांनी केलं.
मोदींनी सांगितले तर वाघाशीही दोस्ती करू - चंद्रकांत पाटील
यापूर्वी काय म्हणाले होते पाटील?
“आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. तसंच फडणवीस आणि पाटील यांच्याशी जमत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. का ते माहीत नाही. पण इकडे जर वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते. मात्र मोदींनी सांगितलं तर त्यांचा आदेश आमच्यासाठी आज्ञा आहे. नेत्याचा आदेश म्हटल्यावर आम्ही वाट्टेल ते करू. पण तसे काही जरी घडले तरी निवडणुका या स्वतंत्रपणेच लढविणार," असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
"बाळासाहेब असते तर त्यांनी नवी मुंबई विमानतळासाठी जेआरडी टाटांचं नाव सुचवलं असतं!"
काय म्हणाले होते राऊत?
"चंद्रकांत पाटील यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो," असं संजय राऊत म्हणाले होते.