पंतप्रधान 'मन की बात' किंवा भाषणात चांगलं बोलतात, परंतु कृती काहीच करत नाहीत : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 03:55 PM2021-02-21T15:55:58+5:302021-02-21T16:01:10+5:30
Supriya Sule : काहींच्यासाठीच मोदींचे अश्रू निघतात, शेतकऱ्यांसाठी नाही, सुप्रिया सुळे यांची टीका
'मन की बात' मधून एक फोन करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. परंतु प्रत्यक्षात फोन केल्यावर पंतप्रधान कार्यालयाचा फोन उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान मोदी हे 'मन की बात' मधून किंवा भाषणात चांगलं-चांगलं बोलतात. पण कृती काहीच करत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. "काहींच्यासाठी मोदींचे अश्रू निघतात. परंतु माझ्या आंदोलन करणार्या शेतकऱ्यांसाठी निघत नाहीत. यावरून मोदींचे अश्रू कुणासाठी आहेत हे लक्षात येते," असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. अंबरनाथ येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर टीकेचा बाण सोडला.
"कोरोनाच्या काळात खासदारांचा १२ कोटींचा निधी कापला. आम्ही कोरोना काळ असल्याने मान्यही केले. मात्र मोदींनी संसदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. तोच निधी एखाद्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी वापरला असता तर आम्हाला चांगलं वाटलं असतं. ज्याची गरज नसताना हा उपद्व्याप का?," असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. हे केंद्र सरकार असंवेदनशीलतेने चालत असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला.
अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कॅबिनेट मंत्री @Awhadspeaks, ठाणे शहराध्यक्ष माजी खासदार @paranjpe_anand प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते @maheshtapase पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. pic.twitter.com/OC8NGje5XH
— Supriya Sule (@supriya_sule) February 21, 2021
अंबरनाथमधील भागातील रस्त्यांची अवस्था चांगली
अंबरनाथ भागातील रस्त्यांची अवस्था चांगली आहे कारण हे रस्ते आमचे सरकार असताना झाले आहेत. याअगोदर या देशात काहीच झालं नाही की कसली उभारणी झाली नाही, जी सहा वर्षांत झाली असे केंद्र सरकार सांगत आहे. अंबरनाथ भागातील कंपन्या मागील पाच वर्षात बंद पडल्या. परंतु नवीन कंपन्या आणण्याचा प्रयत्न केंद्रसरकारने केला नाही. केंद्र सरकारने कामगारांच्या विरोधात कायदा केला आहे. जो तुमच्या आमच्या मुलांच्या मुळावर उठणार असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या.
ईडीच्या नोटीसनंतर गेम चेंज
शरद पवार यांना ईडीची नोटीस आली आणि राज्यात गेमचेंज झाला. यावेळी महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिली असल्याचं म्हणत साताऱ्याच्या पावसातील सभेने महाराष्ट्राचे चित्र बदलले असेही त्यांनी नमूद केले.