"चंद्रकांतदादा... दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:21 PM2021-05-03T14:21:20+5:302021-05-03T14:22:16+5:30
Rupali Chakankar : सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होईल, असा इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिला.
मुंबई : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे हे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव करून विजयी झाले. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांना स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही. कोल्हापुरात त्यांना महापौर बसवता आला नाही. या दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली. (NCP leader Rupali Chakankar Criticizes BJP Maharashtra chief Chandrakant Patil)
यासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर व्हीडिओ शेअर करुन चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. "चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी काहीही देणघेणं नाही. ‘याला महागात पडेल’, ‘त्याला बघून घेऊ’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, ‘त्याला आत टाका’, अशा विषयांवर पीएचडी पूर्ण करुन चंद्रकांतदादा M.Phil करत आहेत. छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर आहेत, असे वक्तव्य चंद्रकांत दादांनी केले होते. मात्र, चंद्रकांतदादांनी आपल्या आजुबाजूला पाहिले तर भाजपामधील अनेक नेतेही जामिनावरच बाहेर आहेत, हे त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी इतरांशी मग्रूरपणे बोलू नये, नाहीतर तुमच्याशिवाय तुमच्या आजूबाजूला असलेल्या इतरांची बोलती बंद होईल", असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूर पुर परिस्थितीत आपण केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे ,आपल्याला आपला मतदार संघ सोडून आमच्या पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदार संघ निवडावा लागला......सुज्ञास फार न सांगावे लागे!! जलयुक्त शिवार , चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा ते PWD1/2 pic.twitter.com/oEbMSK41TC
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 3, 2021
याचबरोबर, "जलयुक्त शिवार , चिक्की घोटाळा , मुंबई बँक घोटाळा ते PWD अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी बाकी आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांच्या आरोग्याचा विषय हा आमचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. या दुष्टचक्रातून एकदा बाहेर पडलो की सगळ्या चौकशी होईल, असा इशाराही रुपाली चाकणकर यांनी दिला.
'बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला', चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा
"छगन भुजबळ यांनी पंढरपूरच्या निकालावर प्रतिक्रिया द्यावी. तुम्ही जामिनावर सुटलेले आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल तर पंढरपूर, पद्दुचेरी आणि आसामवर बोला", असं चंद्रकात पाटील म्हणाले. "पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे असं कसं होऊ शकतं. बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करत असतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो आणि पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवं. वर्षानुवर्षे तिथं सरकारमध्ये असलेले नाही च्या बरोबरीने दिसत आहेत", असंही चंद्रकांत पाटील म्हणाले
काय म्हणाले होते भुजबळ?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'मेरा बंगाल नहीं दूंगी म्हणत ममता बॅनर्जी झाशीच्या राणीसारख्या लढल्या. आता देशात भाजपविरोधी लाट तयार झालीय', असं छगन भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. "ममता बॅनर्जी या झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या आणि मैं अपनी झाशी नही दुंगी असं झाशीच्या राणी म्हणाळ्या होत्या. त्याचप्रमाणे ममता दीदी देखील मैं अपना बंगाल नहीं दुंगी म्हणत लढल्या. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे ८ ते १० मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. पण उपयोग झाला नाही", असा टोला छगन भुजबळ यांनी भाजपला लागवला होता.