पायाखाली कधीही घेऊ, म्हणणाऱ्या संजय जाधवांविरोधात पुरावाच शोधला; शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 06:10 PM2021-08-11T18:10:21+5:302021-08-11T18:18:29+5:30
जर कुठे चुकीचे वागलो असेल, तर पुरावा द्या, राजकारणातून संन्यास घेईल, असे एका वृत्तवाहिनीला बोलताना शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले होते.
परभणी: चुकीचे वागलो असेल तर पुरावा द्या, राजकारणातून संन्यास घेईल, असं शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी घनसावंगीतील भाषणातून सांगितल्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी जमिनीच्या एका फेरफार प्रकरणात महसूल कर्मचाऱ्यांवर खासदार जाधव यांनी दबाव टाकल्याचा संबंधित कर्मचाऱ्यांनी लेखी जबाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची कागदपत्रे मंगळवारी प्रसारमाध्यांना दिली. त्यानुसार त्यांनी खासदार जाधव चुकीचे वागले आहेत. त्यामुळे ते राजकारणातून संन्यास घेणार का?, असा सवाल उपस्थित केला आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरुन शिवसेना- राष्ट्रवादीत वाद सुरु झाला आहे. घनसावंगी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार जाधव यांनी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीबाबत शिफारस केल्याचे सांगितले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने या प्रश्नावरुन रान उठविले, असे सांगून त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादीला कधीही पायाखाली घेऊ, असे ते म्हणाले होते.
सदर प्रकरण सोमवारी दिवसभर चर्चेत आल्यानंतर त्यांनी रात्री स्पष्टीकरण दिले होते. त्यात आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला. मी माझ्या आयुष्यात कधीही चुकीचे काम केले नाही. जर कुठे चुकीचे वागलो असेल, तर पुरावा द्या, राजकारणातून संन्यास घेईल, असे एका वृत्तवाहिनीला बोलताना संजय जाधव यांनी सांगितले होते. त्यांच्या या आवाहनानूसार, राष्ट्रवादीचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना पत्र दिले असून, त्यात परभणी शहरातील सर्व्हे नं.४० व ५२ येथील जमीन प्रकरणात खासदार जाधव यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर दबाव टाकून कमी क्षेत्र असताना जास्तीच्या क्षेत्राची रजिस्ट्री करुन घेतली. त्यावर आपण आक्षेप नोंदिवला. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्याकडे १५ मार्च २०२१ रोजी केली. परंतु कुंडेटकर यांनी कारवाई केली नाही.
चुकीचा फेरफार केला-
जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल या रुजू होताच कारवाई भीतीने कुंडेटकर यांनी ९ ऑगस्ट रोजी तो फेरफार रद्द केला. या प्रकरणात संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खासदार जाधव यांनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे, असेही देशमुख म्हणाले. आता शासकीय कर्मचाऱ्यांनीच खासदार जाधल यांच्या दबावामुळे चुतीचा फेरफार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते आता राजकीय संन्यास घेणार का?, असा सवाल राष्ट्रवीदीचे तालुकाध्यक्ष देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
संजय जाधव नेमकं काय म्हणाले होते?-
भावना अनावर होत आहे. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं आणि सहन करायचं. जेव्हा माकडीन बुडायला येते तेव्हा ती लेकरालाही पायाखाली घेते, मग आम्हीही कधीही राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ शकतो', असं स्फोटक विधान शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जालनातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे.