'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 09:47 AM2021-04-30T09:47:15+5:302021-04-30T09:49:01+5:30
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई : 'युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडे फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील म्हणून पाहता? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपा नेते अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. "युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असे ऐकले होते. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच", असे ट्विट करत रोहित पवार यांनी म्हटले आहे.
युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? 🤔भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच. https://t.co/lbtj30GEWr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 29, 2021
दरम्यान, दिल्लीत नवी संसद भवनाचे काम जोरात सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल रोहित पवार यांनी केला होता. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
"मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी," असे म्हणत अतुल भातखळकरांनी रोहित पवारांवर टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित पवारांवर टीका केली.
काय म्हणाले होते रोहित पवार?
"प्रत्येक गोष्टीचे गांभीर्य पाहून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. त्यानुसार आज देशाची प्राथमिकता काय आहे, याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणे ही खऱ्या अर्थाने आजची प्राथमिकता आहे. त्यासाठी राज्य सरकारे अडचणीत असतानाही हजारो कोटी रुपयांचा भार उचलून लसीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून 'सेंट्रल विस्टा' प्रकल्पाचा भार उचलत आहे. आज हे अपेक्षित नाही आणि योग्यही नाही," असे ट्वीट करत रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.