आमदार रोहित पवारांची आरे सफारी; रिक्षा चालवली, क्रिकेट खेळले अन् आणखी बरचं काही…
By प्रविण मरगळे | Published: February 11, 2021 12:36 PM2021-02-11T12:36:11+5:302021-02-11T12:37:30+5:30
NCP Rohit Pawar in Aarey Colony: पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड वादात अडकला होता, त्यावर ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला,
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना अनेकदा आपण सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळताना पाहिलं असेल, कधी चहाच्या टपरीवर तर कधी युवकांसोबत कट्ट्यावर दिसतात, आत मुंबईतील आरे कॉलनीत येऊन पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांसोबत आमदार रोहित पवारांनी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी रिक्षा चालवली, क्रिकेट खेळले आणि आरेत बाईकवरून फेरफटकाही मारला. यावेळी स्थानिक रहिवाशांनी रोहित पवारांकडे विविध मागण्यादेखील केल्या.
पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मुद्दा प्रचंड वादात अडकला होता, त्यावर ठाकरे सरकारने मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला, मात्र जंगलतोड होऊ नये यासाठी पर्यावरणप्रेमी आंदोलनकर्त्यांवर अनेक गुन्हे नोंदवण्यात आले होते, हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, तसेच स्थानिक आदिवासींच्या घराचा प्रश्न एसआरएच्या माध्यमातून सोडवण्यात यावा अशी मागणी आमदार रोहित पवारांना करण्यात आली.
रोहित पवारांनी या लोकांना समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं, राज्य सरकारनं आरेतील जंगल वाचवलं आहे, त्याठिकाणी आणखी झाडं आपण लावू. केंद्र सरकारने मेट्रो कारशेडचं राजकारण करू नये, राज्य सरकारशी सहकार्य करावं, कोणताही अंहकाराचा मुद्दा यात आणू नये असं सांगत रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्तेही उपस्थित होते, आमदार रोहित पवारांनी न्यूझीलंड हॉस्टेललाही भेट दिली, तेथील अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच व्हॉलीबॉल आणि क्रिकेटचा आनंदही घेतला, त्याचसोबत नारळ विक्रेत्यासोबत गप्पाही मारल्या.