“शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का”; नवाब मलिक यांनी एकाच वाक्यात सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 10:01 AM2022-01-12T10:01:18+5:302022-01-12T10:02:01+5:30

शरद पवार हे भाजपला पर्याय देण्यासाठीच्या कामात असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

ncp nawab malik reaction on is sharad pawar really in a competition with pm candidate race | “शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का”; नवाब मलिक यांनी एकाच वाक्यात सांगितले

“शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का”; नवाब मलिक यांनी एकाच वाक्यात सांगितले

Next

मुंबई: देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसहनेही पाच पैकी तीन राज्यांमधील निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी यासंदर्भात माहिती दिली. यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांना शरद पवारपंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नवाब मलिकांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. 

उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्यांसह भाजपच्या आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याने भाजपविरोधी लाट असल्याचे सिद्ध केले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणखी जसजशा जवळ येतील, तसतसं अधिकाधिक रंजक गोष्टी पाहायला मिळतील.  निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीची रणनीति ठरली आहे. अखिलेश यादव यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांची सकारात्मक चर्चा झाली आहे. जागावाटपावरही कोणताही तिढा नाही, असे नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का

पत्रकारांनी नवाब मलिक यांना शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत का, असा प्रश्न विचारला. यावर, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवार नाहीत. शरद पवार हे भाजपला पर्याय देण्यासाठीच्या कामात असून ते त्यासाठी प्रयत्न करत आहेत. नेतृत्व कोण करणार, हा प्रश्न सध्या नाही. सध्याच्या घडीला पर्याय तयार करण्याचे काम सुरु आहे. शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीच नव्हते, असे मलिकांनी नमूद केले आहे. 

असले प्रकार आम्ही कधीच केले नाही

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचाही नवाब मलिक यांनी घेतला. पोपट चिट्ठी काढणे, भविष्य सांगणे, असले प्रकार आम्ही कधीच केले नाही. किती जागा येतील, याचं भाकित आम्ही कधीच वर्तवले नाही, असा टोला लगावत, मुख्यमंत्री काम करत आहेत, गरज असेल तेव्हा ते बाहेर पडतील. मात्र, मुख्ममंत्र्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर भाजपने केलेली टीका अयोग्य होती, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असून, शरद पवार स्वतः उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहे. तर मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच जागांवर निवडणुका लढवणार आहे. तसेच गोव्यातही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणार उतरणार आहे. गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 
 

Web Title: ncp nawab malik reaction on is sharad pawar really in a competition with pm candidate race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.