“सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवारांचा अजेंडा”: नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:10 PM2021-06-21T18:10:13+5:302021-06-21T18:19:37+5:30
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला गेले असून, सर्व विरोधकांची बैठक होणार आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारबाबत साशंकता निर्माण करणारे वातावरण तयार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने स्वबळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी टोलेबाजी केल्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बने खळबळ उडाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला गेले असून, सर्व विरोधकांची बैठक होणार आहे. यावर, सर्व विरोधकांना एकत्र आणणं हाच शरद पवार यांचा अजेंडा आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. (ncp nawab malik says maha vikas aghadi govt will complete 5 years)
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी या सर्व प्रकारावर भाष्य केले. मोजके पक्ष सोबत नाहीत पण हळूहळू त्यांना एकत्र कसे आणता येईल हे ठरवण्यात येईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
“कार्यक्षमता निर्माण करणारे एखादे आसन मुख्यमंत्र्यांना सूचवा”; भाजपचा पलटवार
महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे काम करेल
हे सरकार किमान समान कार्यक्रमावर उभारण्यात आले आहे. सरकारच्या कामावर लोक समाधानी आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे काम करणार आहे. आज सरकार जाईल, उद्या जाईल या आशेवर भाजपा दररोज एक एक नवीन नवीन विषय काढत आहे. आज-उद्या सरकार पडेल अशी एक एक तारीख सांगत आहेत. मात्र त्यांची एकही तारीख योग्य ठरत नाही किंवा त्यांची भविष्यवाणी खरी ठरत नाही, असा टोला नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना लगावला.
“मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवलं गेलं”: आसिफचा दावा
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपा विरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून, २०२४ निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती शरद पवार आखत असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र मंचच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. राष्ट्र मंचची पायाभरणी २०१८ साली यशवंत सिन्हा यांनी केली होती.