वंचित बहुजन आघाडीच्या गर्दीची राष्ट्रवादी काँग्रेसला धास्ती :पुण्यात मुस्लिम मेळाव्याचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 05:45 PM2019-02-27T17:45:50+5:302019-02-27T17:47:39+5:30
अॅड. प्रकाश आंबेडकर व खासदार ओवेसी यांच्या वंचित विकास आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादाने धास्तावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर उतारा म्हणून त्वरीत पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने मुस्लिमांच्या मेळाव्याचे पुण्यात आयोजन होते
पुणे : अॅड. प्रकाश आंबेडकर व खासदार ओवेसी यांच्या वंचित विकास आघाडीला मिळणाऱ्या प्रतिसादाने धास्तावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर उतारा म्हणून त्वरीत पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने मुस्लिमांच्या मेळाव्याचे पुण्यात आयोजन होते . त्याच्या यशस्वितेवर नंतर अन्य जिल्ह्यात तसेच राज्यातही असे संघटन तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
दहशतवादी हल्ल्यांमध्ये सातत्याने मु्स्लिमांच्या संघटना, मुस्लिम आरोपी निदर्शनास येतात. त्यांची छायाचित्रे, नावे सातत्याने समोर येत राहतात. त्यामुळे सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात विनाकारण अपराधी भावना निर्माण होते. त्यांच्याकडे पाहण्याची इतरजनांची दृष्टिही कलुषीत होते. यातून त्यांना बाहेर आणण्यासाठी म्हणून हा मेळावा असल्याचे गारटकर यांच्याकडून सांगण्यात येत होते.
आंबेडकर व ओवेसी यांनी स्थापन केलेल्या वंचित विकास आघाडीची सभा काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झाली. या सभेला असणारी गर्दी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली होती. समाजातील हा घटक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची वोट बँक आहे. वंचित विकास आघाडीचा प्रतिसाद असाच वाढत राहिला तर या वोट बँकेला धक्का बसेल या विचारानेच अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून असे मेळावे आयोजित करण्याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुचवले असल्याचे बोलले जात आहे. मेळाव्याची माहिती देताना गारटकर यांनीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांची अशा मेळाव्यांना संमती असल्याचे स्पष्ट केले होते.