"मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!"; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 08:40 AM2021-03-23T08:40:41+5:302021-03-23T08:41:41+5:30

NCP Rohit Pawar Slams BJP And Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे

NCP Rohit Pawar Slams BJP And Devendra Fadnavis Over Parambir Singh Case | "मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!"; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

"मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!"; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना सणसणीत टोला

Next

मुंबई - परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील या घटनेवरुन संसदेतही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपावर (BJP) जोरदार टीका केली आहे. तसेच "मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत!" असं म्हणत त्यांनी फडणवीसांना सणसणीत टोला लगावला आहे. 

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय  होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या 'प्रेस बाईट'चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात 'मी पुन्हा येईन'चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं" असं म्हणत रोहित यांनी निशाणा साधला आहे. 

"विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं"

"गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या  गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं."

"सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं"

"एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते, म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे. हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे. हा सगळा प्रकार आणि गेल्या काही दिवसातील घडामोडी बघता मार्क ट्वेनच्या 'सत्य समोर येईपर्यंत असत्य गावभर हिंडून येतं', या वाक्याची प्रचिती येते आणि हा राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न असल्याचा दाट संशय येतो" असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

"सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा"

"अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा. काही महिन्यांपूर्वीही सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव खेळण्यात आला, परंतु त्या ठिकाणीही सत्य समोर आलंच. या प्रकरणीही सत्य समोर येईलच, परंतु या सर्व घडामोडींमध्ये जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला पडू नयेत हिच अपेक्षा" असं रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस"

काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस" असं म्हणत काँग्रेसने निशाणा साधला आहे. "भाजपाच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?" असा सवाल विचारत काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे (Dr. Raju Waghmare) यांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच "15 फेब्रुवारी रोजी प्रेस झाली परंतू हॉस्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस व भाजप नेते कृपा करून तपासून घ्या" असं वाघमारे यांनी म्हटलं आहे. 

Web Title: NCP Rohit Pawar Slams BJP And Devendra Fadnavis Over Parambir Singh Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.