रोहित पवारांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर; नकलीपणाच्या "त्या" आरोपावर लगावला सणसणीत टोला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 07:18 PM2021-01-25T19:18:42+5:302021-01-25T19:28:16+5:30

NCP Rohit Pawar And Nilesh Rane : निलेश राणेंच्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

ncp rohit pawar Slams bjp nilesh rane over farm laws | रोहित पवारांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर; नकलीपणाच्या "त्या" आरोपावर लगावला सणसणीत टोला, म्हणाले...

रोहित पवारांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर; नकलीपणाच्या "त्या" आरोपावर लगावला सणसणीत टोला, म्हणाले...

googlenewsNext

मुंबई - भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. रोहित पवार शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर पलटवार करताना निलेश यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. ''नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत'' असे ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. मात्र आता निलेश यांच्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

रोहित पवार यांनी "बातमीची शहानिशा न करता मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज आहे. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील" असं म्हणत निलेश राणेंना टोला लगावला आहे. रोहित यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा असलेला विरोध आणि या पार्श्वभूमीवर होत असलेले शेतकरी आंदोलन हा खूप महत्वपूर्ण विषय आहे. यासंदर्भात, मी ४ डिसेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पोस्टचा आधार घेऊन काही न्यूज पोर्टलने मी दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केलाय. पण हा आरोप अर्धवट माहितीवर एकांगी पद्धतीने करण्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळं कृषि कायद्यांबाबत मी माझी भूमिका पुन्हा एकदा इथं स्पष्ट मांडतोय, हे टीकाकारांनी जरुर लक्षात घ्यावं" असं रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

"नव्या कायद्यांमुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्याला येऊ शकणाऱ्या अडचणी मी सांगितलेल्या आहेत. मग या अडचणी येणार असतील तर कायद्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या तरतुदी करायला नको का? आणि शेतकरी हिताच्या तरतुदी असायला हव्यात ही मागणी करणे हा दुटप्पीपणा आहे का? असेल तर मग हो... शेतकऱ्याच्या हितासाठी रोहित पवार याबाबतीत नक्कीच दुटप्पीपणा करत आहे आणि तो करतच राहीन. मी स्वतः एक उद्योजक असल्याने मी तर कृषी कायद्यांची बाजू घेतली पाहिजे, परंतु शेतकरी हा देशाचा कणा आहे, तो वाचला तर देश वाचेल हे मी जाणून आहे."

"शेतकरी हा शेतकरी असतो, त्याला ना जात, ना धर्म, ना प्रांत असतो. तो जगाचा पोशिंदा आहे. म्हणून त्याला सन्मान द्यायलाच पाहिजे. तसंच कृषी कायदे आणि त्यातल्या तरतुदी काय, शेतकऱ्यांचा विरोध कशासाठी या सर्व बाबी प्रत्येक भारतीयाने विशेषत: तरुणांनी सर्व बाजूंनी विचार करून समजून घ्यायला हव्यात. यामध्ये माध्यमांची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे. लोकशिक्षणाचं काम माध्यमंच करत असतात. त्यांनीही या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन व्यापक आणि वास्तववादी वृत्तांकन करावं, ही अपेक्षा आणि माध्यमात आलेल्या बातमीची शहानिशा न करता मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज आहे. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील" असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

Web Title: ncp rohit pawar Slams bjp nilesh rane over farm laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.