धन्यवाद ताई! रोहित पवारांनी केलं पंकजा मुंडेंच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 02:42 PM2020-10-28T14:42:43+5:302020-10-28T15:30:52+5:30
Rohit Pawar And Pankaja Munde : रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.
मुंबई - भाजपातील नेतृत्वावर नाराज असलेल्या नेत्यांपैकी एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे वादळ शमत नाही तोच पंकजा मुंडे यांनी मंगळवारी शरद पवारांची स्तुती केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या कार्यशैलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
पंकजा मुंडे यांनी बैठकीनंतर याबाबत ट्विट केलं होतं. या ट्विटवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या दिलदारपणा आणि खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा." असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा. https://t.co/ug3f21o56g
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2020
खडसेंनंतर पंकजांकडून शरद पवारांचे कौतुक
पंकजा मुंडे यांनी "शरद पवार यांना हॅट्स ऑफ. कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले...पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे" असं म्हटलं आहे. दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, हे त्यांनी यानिमित्ताने सांगितले.
@PawarSpeaks hats off ... कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले ... पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 27, 2020
पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्यात चर्चाही सुरू होती. या बैठकीत कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना 14 टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन 19 टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील.