“तुम्ही राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी”; PM मोदींना राष्ट्रवादीचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 08:36 AM2021-08-07T08:36:12+5:302021-08-07T08:36:40+5:30
khel ratna: काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीकडून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे.
मुंबई: टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यातच केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारचे नाव बदलण्याचे ठरवले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधाननरेंद्र मोदींनी केली आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीकडून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. तुम्ही राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी असल्याचा खोचक टोलाही यावेळी लगावण्यात आला. (ncp rupali chakankar criticised pm modi over rajiv gandhi khel ratna award renamed)
“अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवावे, जनतेची मोठी मागणी”; PM मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले की, मला संपूर्ण देशवासीयांकडून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद ठेवण्याबाबत आग्रह केला जात होता. लोकांच्या या भावनेचा सन्मान राखत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. खेलरत्न पुरस्कार यापुढे मेजर ध्यानचंद पुरस्कारने ओळखला जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून, केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि RSS वर निशाणा साधण्यात आला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
“मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते, पण...”; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया
तुम्ही राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी
जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदलले, हे चांगल आहे पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये, आधीच्या सरकारने केलेल्या कामांची नावे फक्त राजकीय द्वेषातून बदलून त्याचे श्रेय लाटण्याची या सरकारची जुनी खोड आहे. तापलेल्या तव्यावर स्वतःची चपाती भाजण्याची सवय भाजपाने आता तरी बदलायला हवी. जनतेच्या आणखीही बऱ्याच मागण्या आहेत त्याकडे देखील प्रधान'सेवकांनी' लक्ष द्यावे, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.
"जनतेची मागणी" म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे... चांगलं आहे.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 6, 2021
जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत
१- महागाई कमी करा
२- युवकांना रोजगार द्या
३- महिलांना सुरक्षा द्या
४- शेतकऱ्यांना सन्मान द्या
५- राजीनामा द्या
मेजर ध्यानचंद महान खेळाडू, हॉकीचे जादूगार होते
मेजर ध्यानचंद हे महान खेळाडू आहेत. ते हॉकीचे जादूगार होते. सरकारने त्यांचे नाव दिले आहे. पण वारंवार एखाद्या योजनेची नावे बदलणे आणि त्यातून काय मिळवायचे आहे हे सरकारला माहिती आहे. ध्यानचंद यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यावर टीका टिपणी होऊ नये, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. दुसरीकडे, प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, जनतेची अशी मोठी मागणी आहे की, अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे. खेळाडूंच्या सन्मानामध्ये देखील राजकीय डावपेच का?, अशी विचारणा करत हा निर्णय चुकीचा असून माझा त्याला विरोध आहे, असे ट्विट काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केले आहे.
केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल; काँग्रेसची टीका
दरम्यान, राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय, अशी विचारणा करत केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. केंद्रातील भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.