“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 03:26 PM2021-07-07T15:26:25+5:302021-07-07T15:27:47+5:30
राष्ट्रवादीकडून खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
मुंबई: राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन अनेकविध मुद्द्यांवरून चांगलेच गाजले. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC भरतीतील दिरंगाई यांसारख्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला विरोधकांनी घेरल्याचे पाहायला मिळाले. त्यातच भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन, विधानसभेत गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यावरून कारवाईचे देण्यात आलेले आदेश हेही मुद्दे चांगलेच चर्चिले गेले. आता यावरून राष्ट्रवादीकडून खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. (ncp rupali chakankar criticized ravi rana and navnit rana)
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संस्थगित झाले असले, तरी त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असल्याचे पाहायला मिळाले आहे. आमदार रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.
“महागाई आऊट ऑफ कंट्रोल झालीय; सामान्य जनता, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय”
हे तर बंटी-बबली निघाले
बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले, या शब्दांत नवनीत राणा आणि रवी राणा यांचे नाव न घेता रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. अलीकडेच अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करत दोन लाखांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या.
बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले#अधिवेशन
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 7, 2021
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. भाजपने विधानसभेच्या आवारात अभिरूप विधानसभा भरवली. याववरून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.