कल्याणमध्ये आगरी कार्डाभोवती राष्ट्रवादी-शिवसेनेचा पिंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 04:59 AM2019-04-24T04:59:35+5:302019-04-24T05:00:17+5:30
शिवसेनेचा विकासावर भर; आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
- प्रशांत माने
शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यातील थेट लढत यंदा कधी नव्हे एवढी आगरी मतांवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या महापालिका, नगरपालिका, ग्रामीण राजकारणात, तसेच प्रकल्पांवेळी झालेल्या अन्यायात शिवसेनेने या समाजाला डावलल्याची भावना त्या समाजात तीव्र आहे. या समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याची चित्रफीतही या काळात व्हायरल होते आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरील लढाईत या समाजाने काय कमावले, हा प्रश्नही प्रचारात तीव्र बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘आमचं ठरलंय’ असा मेसेज व्हायरल होतोय आणि त्यामुळे ‘त्यांचं काय ठरलंय’ याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शिवसेना-राष्ट्रवादीकडून सुरू आहे. रिंगणात जरी श्रीकांत शिंदे व बाबाजी पाटील असले, तरी मुलामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वत: न लढता काम करू असा शब्द दिल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आगरी, मराठा-कुणबी व अन्य बहुभाषिकांसह मुस्लिम, दलित, सिंधी व उत्तर भारतीयांची मते येथे निर्णायक असली, तरी भूमिपुत्र विरुद्ध उच्चशिक्षित, विकास विरुद्ध जात हेच मुद्दे प्रामुख्याने प्रचारात आहेत. श्रीकांत शिंदे मागच्या वेळी राजकारणात नवे होते. गेल्या पाच वर्षांत तेही राजकारणातील बारकावे शिकले आहेत. उल्हासनगर, डोंबिवली पश्चिम, मलंगगड, दिवा, कल्याण ग्रामीण येथील सेनेच्या रॅलीत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. शक्तिप्रदर्शन केले. एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे संबंध उल्हासनगरच्या प्रचारावेळी ताणले गेले होते. मात्र, आता ते सुधारल्याने दोन्ही पक्ष प्रचारात उतरले आहेत.
राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते गणेश नाईक स्वत: उतरले आहेत. मेळाव्यांबरोबर वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांचा भर आहे. नाईक यांनी बाबाजींना सोबत घेत, डोंबिवलीत सेना-भाजपच्या आगरी नगरसेवकांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. नेवाळीत विमानतळाच्या जागेवरून झालेला हिंसाचार आणि तेथे भूमिपुत्रांवर झालेला अन्याय, तेथील आक्रोश चर्चेत आहे. पालिकेतून २७ गावे वगळण्याचा मुद्दा न सुटल्याने सर्वपक्षीय संघर्ष समितीने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीला मनसेची साथ असली, तरी पाठिंबा देण्यावरून त्या पक्षात दोन गट पडल्याचे चित्र आहे.
वाहतूककोंडी, रेल्वेच्या समस्या, रुग्णालय सुविधांचा बोजवारा आदी प्रश्न कायम आहेत. प्रचारात आमचा भर वैयक्तिक भेटीगाठींवर आहे. रॅली काढून वाहतूककोंडी करून नागरिकांना आम्ही त्रास देत नाही. स्थानिक, आगरी समाजाचा असलो, तरी आमच्याकडून जातीचा प्रचार केला जात नाही.
- बाबाजी पाटील, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस.
रॅली व घरोघरीच्या प्रचाराला चांगली साथ लाभत आहे. मतदार सुशिक्षित असून, आगरी समाज हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला आहे. आताही त्यांची साथ लाभेल, यात शंका नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन काम करत आहोत. समाजाचा विकास शिवसेनाच करू शकते, असा विश्वास मतदारांना आहे..
- डॉ. श्रीकांत शिंदे, उमेदवार शिवसेना
कळीचे मुद्दे
२७ गावे वगळण्याच्या मुद्द्यासह नेवाळी आंदोलनातील भूमिपुत्रांवरील अन्याय, सत्तेत सेनेकडून डावलला गेलेला
आगरी समाज.
रेल्वे प्रवाशांचे प्रश्न, कळवा-ऐरोली लिंकमार्ग, ठाकुर्ली टर्मिनस, पाचवी-सहावी मार्गिका, कल्याण यार्डाच्या रिमॉडेलिंग प्रकल्पांची रखडगाथा.