NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 02:28 PM2024-10-23T14:28:44+5:302024-10-23T14:33:07+5:30
NCP Vidhan Sabha Candidate List 2024: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची घोषणा केली. यात पहिल्या यादीत काँग्रेसमधून आलेल्या दोन विद्ममान आमदारांचाही समावेश आहे.
NCP Ajit Pawar Vidhan Sabha 2024: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने क्रॉस व्होटिंग ठपका ठेवलेल्या आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या दोन विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या ७ आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याने खळबळ उडाली होती. त्यांना तिकीट न देण्याचं धोरण काँग्रेसने स्वीकारले. त्यामुळे या आमदारांनी इतर पक्षांचा मार्ग धरला.
इगतपुरीतून हिरामण खोसकर
क्रॉस व्होटिंग केलेल्या आमदारांची नावे काँग्रेसने जाहीर केली नाही. पण, पक्षातील सूत्रांच्या माहितीप्रमाणे यात हिरामण खोसकरही होते. हिरामण खोसकर यांनी मात्र हे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत.
आरोप फेटाळतानाच हिरामण खोसकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नसल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. पण, पवारांनी प्रतिसाद न दिल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेल्या हिरामण खोसकर यांनी शिवसेनेच्या निर्मला गावित यांचा पराभव केला होता. खोसकर यांना ८६ हजार ५६१ मते मिळाली होती. तर गावित यांना ५५ हजार ६ मते मिळाली होती. या मतदारसंघात शिवसेनेच्या निर्मला गावित काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
सुलभा खोडके यांना अमरावती शहरमधून उमेदवारी
सुलभा खोडके यांचे पती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांचेही नावही चर्चिले गेले. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाची ही जागा अजित पवारांकडे गेली.
अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातून सुलभा खोडके विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपाचे सुनील देशमुख यांचा पराभव केला होता. सुलभा खोडके यांना ८२ हजार ५८१ मते मिळाली होती. तर देशमुख यांना ६४ हजार ३१३ मते मिळाली होती. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अलीम पटेल मोहम्मद वाहीद यांना १७ हजार १०३ मते मिळाली होती. अमरावती मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार विजयी झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघाताचा निकाल महत्त्वाचा असणार आहे.