धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; रात्री उशिरा झाली शरद पवारांसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 07:51 AM2021-01-15T07:51:10+5:302021-01-15T07:52:29+5:30
Dhananjay munde News: शरद पवारांनी गुरुवारी दुपारी पक्ष म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाची माहिती घेतली होती.
मुंबई : गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व त्यांचा राजीनामा यावर महत्वाची चर्चा करण्यात आली. मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित होते. शरद पवारांनी गुरुवारी दुपारी पक्ष म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र, त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाची माहिती घेतली होती.
मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला रेणू शर्मा ही इतर काही नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी संपर्क करत होती. भाजपासह काही नेत्यांनी अशाप्रकारचे आरोप केले आहेत. तसेच तिचा जबाब, मुंडेंचा जबाब पोलिस नोंदविणार आहेत. यामुळे एकूणच हा प्रकार संय़शयास्पद असल्याने राष्ट्रवादीनेदेखील सावध भूमिका घेतली असून तूर्तास राजीनामा न घेण्याचा राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. एबीपी माझाने या बाबतचे वृत्त दिले आहे.
मुंडे काय म्हणालेले...
पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. आता पोलीस चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील म्हणाले होते.
शरद पवार काय म्हणालेले...
धनंजय मुंडेवरील आरोपांबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. शदर पवार म्हणाले की, "धनंजय मुंडेंनी काल माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची बाजू सविस्तर मांडली. त्यांचा काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध आला. आता त्याबद्दल पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणावरून व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले होणार याची बहुधा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच न्यायालयात गेले. त्यामुळे न्यायालयाच्या विषयावर मी बोलणार नाही,' असं शरद पवार यांनी सांगितलं.
"धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, विचारविनियम झाल्यावर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल," असं पवार म्हणाले होते.