भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष
By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 09:39 AM2020-11-15T09:39:54+5:302020-11-15T09:45:22+5:30
बिहारमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू; एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळालं. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या आहेत. आज पाटण्यात एनडीएच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे. यामध्ये संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीश कुमार यांची गटनेते म्हणून औपचारिक निवड होईल. या बैठकीत भाजपचे दिग्गज नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. याशिवाय बिहार विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीसदेखील सहभागी होतील.
‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’
नितीश कुमार यांची एनडीएचे गटनेते म्हणून निवड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला एनडीएचे चारही घटक पक्षांचे (जेडीयू, भाजप, हम, व्हीआयपी) नेते उपस्थित होते. एनडीएची पुढील बैठक रविवारी होणार असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे आज होणारी बैठक अतिशय महत्त्वाची आहे.
बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; एनडीएत सामील होण्याची शक्यता
भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष
भाजपनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारचं नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वानं स्पष्ट केलं आहे.
कंदील, कमळ आणि बिहारचे महाराष्ट्र कनेक्शन
नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.