‘सरदारांच्या पुतळ्यामुळे नेहरूंना कमीपणा नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:39 AM2019-04-19T04:39:10+5:302019-04-19T04:40:03+5:30
गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना कमीपणा आणण्यासाठी उभारलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे गुरुवारी सांगितले.
अमरेली : गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना कमीपणा आणण्यासाठी उभारलेला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे गुरुवारी सांगितले.
प्रचारसभेत ते म्हणाले की, सरदार पटेल हे काँग्रेसचे नेते होते. मात्र आजवर एकाही काँग्रेस नेत्याने या पुतळ्याला भेट दिलेली नाही. सरदार पटेल यांचे कर्तृत्वच एवढे महान आहे की त्यांच्यापुढे इतरांना खुजे दाखविण्याचे काहीच कारण नाही. केंद्र सरकारने केलेल्या कठोर कारवाईमुळे जम्मू-काश्मीरमधील दोन-अडीच जिल्ह्यांपर्यंतच आता दहशतवादी कारवाया मर्यादित राहिल्या आहेत. याआधी पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, काशी, जम्मू अशा अनेक ठिकाणी अधूनमधून बॉम्बस्फोट झाल्याचे ऐकण्यात येत असे. पण गेल्या पाच वर्षांत देशात कुठेही बॉम्बस्फोट घडलेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मीरचा प्रश्न चिघळला. जम्मू-काश्मीरमधील काही भाग वगळला, तर त्या राज्याच्या अन्य भागात शांतता आहे. मुंबईवर २००८ साली दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काँग्रेस केंद्रात सत्तेवर होती. त्या हल्ल्याला काँग्रेसने चोख दिले नाही. आमच्या राजवटीत मात्र सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवण्यात आला. (वृत्तसंस्था)
>कणखर सरकार निवडून आणण्याचे आवाहन
लोकसभा निवडणुकांत केंद्रामध्ये कणखर सरकार निवडून आणा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना केले. कर्नाटकातील बागलकोट येथे गुरुवारी एका प्रचारसभेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, कणखर सरकार पाहायचे असेल तर दिल्लीतील आमच्या सरकारकडे बघा, दुबळे सरकार पाहायचे असेल तर कर्नाटकातील एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारकडे पाहा.