कर्नाटकात नवे पर्व...विधानसभा निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून कर्नाटकात बसवराज बाेम्मई यांच्याकडे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 06:00 AM2021-07-28T06:00:57+5:302021-07-28T06:03:16+5:30
बसवराज हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बाेम्मई यांचे पुत्र आहेत. विद्यमान सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्त्वाचे गृह खात्याची जबाबदारी हाेती.
बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा सुरू हाेती. अखेर बी. एस. येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बाेम्मई यांच्या नावाची घाेषणा करण्यात आली. राज्यात वर्चस्व असलेल्या लिंगायत समाजातून आलेले बाेम्मई यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व देउन भाजपने सर्वमान्य चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. वडील आणि मुलगा दोघे मुख्यमंत्री असे कर्नाटकात दुसऱ्यांदा घडत आहे. एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र कुमारस्वामी हेही कर्नाटकात मुख्यमंत्री होते.
बसवराज हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बाेम्मई यांचे पुत्र आहेत. विद्यमान सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्त्वाचे गृह खात्याची जबाबदारी हाेती. कर्नाटकमध्ये सत्तेच्या चाव्या बहुतांशी लिंगायत समाजाकडे आहेत. येडीयुरप्पा यांना वय झाल्याचे कारण देऊन बाजुला सारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यांनाही नाराज करुन चालणार नव्हते. येडीयुरप्पा यांना हटविण्यास लिंगायत समाजातून बराच विराेध हाेता. समाजातील धर्मगुरुंनीदेखील भाजपला तसे सुचविले हाेते. त्यामुळे या समाजाची नाराजी ओढावून घेणे पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत परवडण्यासारखे नव्हते. अखेर लिंगायत समाजातूनच राज्याला नवे नेतृत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे २०२३ची विधानसभा निवडणूक डाेळ्यासमाेर घेऊन बसवराज यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे बसवराज हे देखील लिंगायत समाजाचे माेठे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री एस. आर. बाेम्मई यांचाही वारसा त्यांच्याकडे आहे. बाेम्मई यांची झुंझार आणि लढवय्ये नेते म्हणून ओळख हाेती.
बसवराज हे येडियुरप्पा यांच्या मर्जीतील नेते
बी. एस. येडीयुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली हाेती. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार हाेण्यापूर्वी त्यांनी मुलांना केंद्रात पद मिळण्याबाबत चर्चा केली हाेती. त्याबाबत आता पक्षनेतृत्त्वाकडून काय निर्णय घेण्यात येताे, याकडेही लक्ष लागले आहे. बसवराज हे येडीयुरप्पा यांच्या मर्जीतील नेते आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले तरीही पडद्यामागून येडीयुरप्पा हेच सुत्रे हलिवणार का, असाही प्रश्न उपस्थित हाेताे. बसवराज हे स्वत:ची वेगळी छाप पाडणार की येडीयुरप्पा यांचीच सावली बनून राहणार का? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.