भाजपाकडून केंद्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीसांना नवी जबाबदारी?; लवकरच होणार घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:19 PM2020-08-14T12:19:41+5:302020-08-14T12:21:22+5:30
याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते सी. पी ठाकूर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उत्तम नेते आहेत आणि निवडणुकीत ते चांगल्यारितीने काम करतात अशा शब्दात स्तुती केली आहे.
नवी दिल्ली - सध्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे राष्ट्रीय पक्षांचे लक्ष्य लागून राहिलं आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक पक्ष जोमाने काम करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहारच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी देणार असल्याचं सांगितले जात आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.
विद्यमान बिहारचे भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत ते काम करतील. गुरुवारी कोअर कमिटीच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते. काही दिवसांत देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते सी. पी ठाकूर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे उत्तम नेते आहेत आणि निवडणुकीत ते चांगल्यारितीने काम करतात अशा शब्दात स्तुती केली आहे. याबाबतचं वृत्त हिंदी न्यूज चॅनेलने दिले आहे.
बिहारमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूसोबत भाजपा आघाडी करुन निवडणूक लढवत आहे. मात्र निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रमुख नेत्यांना बिहारच्या निवडणुकीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय नेतृत्वात संधी देणार अशी चर्चा सुरु होती. त्याचाच एक भाग म्हणून बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस यांची कारकिर्द
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी सलग ५ वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. यादरम्यान त्यांनी तत्कालीन मित्रपक्ष शिवसेनेसोबत युतीमध्ये सरकार चालवलं होतं. अनेकदा काही मुद्यावरुन शिवसेनेकडून सरकारवर टीकास्त्र सोडलं जात असताना फडणवीसांना त्यांच्यासोबत सरकार चालवण्याचं उत्तम काम पार पाडलं. गेल्या ५ वर्षात त्यांनी राज्यात भाजपाचं संघटन कौशल्य दाखवलं आहे. मराठी भाषेसोबत हिंदी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे. सध्या ते महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करुन राज्यात भाजपाचे १०५ उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी केंद्रीय पातळीवर जबाबदारी देण्यापूर्वी बिहार निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व चाचपणी पक्षाकडून करुन घेण्यात येत आहे.