उपमुख्यमंत्र्यांचा पत्ता का कापला?; देवेंद्र फडणवीसांनी पुढील प्लान सांगितला
By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 08:49 PM2020-11-16T20:49:27+5:302020-11-16T20:50:49+5:30
मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या सुशील मोदींना यंदा भाजपनं संधी नाकारली
पाटणा: संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीश यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सलग चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यामध्ये सुशील कुमार मोदी यांचा समावेश नाही. त्यामुळे नाराज झालेले सुशील मोदी सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेपासून दूर राहिले. मागील सरकारमध्ये मोदी यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद होतं. मात्र यंदा पक्षानं त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही.
मोदींच्या भाजपवर मोदी नाराज; अमित शहांच्या पाटणा भेटीकडे 'सुमों'नी फिरवली पाठ
नितीश कुमार यांनी शपथविधीनंतर सुशील कुमार मोदींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मात्र याबद्दलचे प्रश्न तुम्ही भाजप नेत्यांना विचारा, असं उत्तर त्यांनी दिलं. 'जनमताचा कौल मिळाल्यानं राज्यात एनडीएनं सरकार स्थापन केलं आहे. सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद का देण्यात आलं नाही, याबद्दलचे प्रश्न तुम्ही त्यांना (भाजपला) विचारा. कारण हा निर्णय त्यांनी घेतला आहे,' असं कुमार म्हणाले. आमची भाजपसोबत युती आहे. आम्ही सोबत काम करतो आणि यापुढेही करत राहू, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.
“बिहारच्या जनादेशावर भाजपाचा बलात्कार, त्याची पैदास नितीश कुमार”; RJD नेत्याचं वादग्रस्त विधान
बिहार निवडणुकीचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनादेखील सुशील मोदींना उपमुख्यमंत्रिपद का नाकारण्यात आलं, याबद्दलचे प्रश्न विचारण्यात आले. 'सुशील मोदी अजिबात नाराज नाहीत. ते पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. पक्ष नक्कीच त्यांचा विचार करेल. त्यांच्याकडे नवी जबाबदारी दिली जाईल,' असं फडणवीस म्हणाले.
Sushil Modi Ji is not at all upset. He is an asset to us. Party will think about him, a new responsibility will be given to him: Devendra Fadnavis, BJP in-charge for #BiharElectionshttps://t.co/OKCpu55gA0
— ANI (@ANI) November 16, 2020
उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्यानं सुशील मोदी नाराज
नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज पाटण्यात होते. मात्र त्यांच्या स्वागतासाठी सुशील मोदी गेले नाहीत. मोदींनी त्यांच्या या कृतीतून पक्ष नेतृत्त्वाकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचं सुत्रांनी सांगितलं. काल दिवसभर सत्ता स्थापनेच्या घडामोडी आणि बैठका सुरू होत्या. त्यातही मोदींचा सहभाग नव्हता.
जास्त जागा जिंकूनही भाजपानं नितीश कुमारांना मुख्यमंत्री का बनवलं? वाचा इनसाईड स्टोरी
सुशील मोदींनी जवळपास १३ वर्षे नितीश कुमार यांच्यासोबत काम केलं आहे. मागील सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. त्यामुळे आताही त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पक्षानं त्यांना संधी दिलेली नाही. त्यामुळे मोदी नाराज आहे. कार्यकर्ता हे पद म्हणजे माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत, असं मोदींनी कालच म्हटलं होतं. त्यावरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजपनं उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर दोघांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे. तारकिशोर प्रसाद, रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे.
भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष
भाजपनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारचं नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वानं स्पष्ट केलं होतं.
नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व असलं, तरीही सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.