नाशिकचा पुढचा पालकमंत्री शिवसेनेचा; संजय राऊतांच्या विधानाने राजकारणात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 07:29 AM2021-06-14T07:29:53+5:302021-06-14T07:30:24+5:30
Sanjay raut in nashik: शिवसेना कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यशैलीमुळे जिल्ह्यातील शिवसेना आमदारांना निधी मिळण्यात विलंब होण्यासह कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी रविवारी खा. संजय राऊत यांच्याकडे केल्या. त्यावर त्यांच्या कार्यशैलीला शिवसेना स्टाइलमध्येच उत्तर द्या, असे सांगून पुढील पालकमंत्री शिवसेनेचाच होईल, यासाठी कामाला लागण्याचे आदेश राऊत यांनी दिले.
शिवसेना कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक झाली. राज्यात सत्ता असूनही जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या प्रभावामुळे कामांचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. या वेळी राऊत यांनी शिवसेनेकडे सत्ता नसतानाही आपण अनेकांना आपल्या स्टाइलने उत्तरे दिली आहेत. त्याप्रमाणेच पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीला शिवसेना स्टाइलमध्ये उत्तर द्या, तसेच विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून आणले तर आपलाच पालकमंत्री बसवता येईल, अशी व्यवस्था करा, असेही ते म्हणाले.
पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री
राज्यात पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. महाविकास आघाडीची स्थापना करतानाच हे ठरले असल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केेले. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला असून त्यांना शिवसेनेतील नवा प्रवाह माहिती नसल्याची टीकाही त्यांनी केली. पायी वारीसाठी फूस लावणारे काही राजकीय पक्ष व संघटना वारकऱ्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.