“...पण त्यांचा अंत वाईट असतो; जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत”
By प्रविण मरगळे | Published: January 19, 2021 10:44 AM2021-01-19T10:44:59+5:302021-01-19T11:01:57+5:30
महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्ष झाला आहे, मग या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
मुंबई – मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय इतिहासात मोठी उलथापालथ घडली, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचं बिनसलं, त्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केले, मुख्यमंत्री म्हणून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. मात्र या सत्तासंघर्षाच्या काळात ७२ तास खूप महत्त्वाचे ठरले, ते म्हणजे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेत सरकार स्थापन केले. मग प्रश्न पडतो की, भाजपासोबत जाण्याचा निर्णय अजित पवार यांचा वैयक्तिक होता की शरद पवारांनीच तो प्लॅन रचला होता.
महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्ष झाला आहे, मग या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादीकडूनच भाजपाला सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव आला होता, शरद पवारांसोबत चर्चा झाली होती, कोणाला कोणं खातं द्यायचं, पालकमंत्री कोण, महामंडळ वाटप कसं होणार? याबाबत सविस्तर चर्चा झाली होती, राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस हे सगळं शरद पवारांना माहिती होतं असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र यावर कोणीही राष्ट्रवादीचा नेता खुलासा देण्यासाठी पुढे आला नाही.
आता यावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटमधून टीका केली आहे. निलेश राणे म्हणतात की, गद्दारी करून ठाकरे सरकारमध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही, हेराफेरी करणाऱ्यांना सुरूवातीला यश मिळतं, पण त्यांचा अंत वाईट असतो, स्वत:ला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात जो सत्तासंघर्ष सुरू होता, त्यावेळी नोव्हेंबर २०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच भाजपाकडे सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यावेळी भाजपाची चर्चा अजित पवार नव्हे, तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीच झाली होती. अगदी खातेवाटपाची बोलणी अंतिम झाली होती, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. नागपुरात एका कार्यक्रमात फेसबुकच्या माध्यमातून ते बोलत होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये जे काही घडले ते मी का केले असे अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. मात्र त्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत जाण्याचे ठरविले असल्याचं आम्हाला कळालं. त्यानंतर १० ते १२ दिवस आम्ही विविध पर्यायांवर विचार केला व राष्ट्रवादीशी बोलणी केली. सरकार स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडूनच आला होता. आमची बोलणीदेखील अंतिम झाली होती. सरकार बनविण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली. खातेवाटप, जिल्ह्यांचे पालकमंत्रीदेखील निश्चित केले. ही सगळी चर्चा शरद पवारांसोबतच झाली होती. राज्यात राष्ट्रपती शासन लागले व त्यासाठी दिलेले पत्रदेखील मीच ‘ड्राफ्ट’ केले होते असाही खुलासा फडणवीसांनी केला.