Nilesh Rane: “खऱ्या आईचे दूध प्यायला असाल तर…” निलेश राणेंचे शिवसेनेला थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 09:29 AM2021-08-24T09:29:20+5:302021-08-24T09:34:31+5:30
Nilesh Rane challenges Shiv Sena: नितेश राणे यांनी युवासेनेला डिवचल्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.
मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात निघालेल्या अटकेच्या आदेशांनंतर राणे समर्थक कमालीचे आक्रमक झाले आहेत. एकीकडे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी युवासेनेला डिवचल्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे. (Nilesh Rane challenges Shiv Sena) त्यामुळे राणेंवर अटकेची कारवाई झाल्यास भाजपामधील राणे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये जोरदार वाद पेटण्याची शक्यता आहे. (Nilesh Rane directly challenges Shiv Sena after arrest Order against Narayan Rane)
निलेश राणे यांनी यासंर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, कुठेतरी बॅनर लावून आणि मीडियावर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ, असे थेट आव्हान निलेश राणे यांनी दिले आहे.
कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 24, 2021
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. यात मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनीही त्याबाबतची माहिती ट्विटरवर दिली असून शिवसैनिकांना थेट ओपन चॅलेंजही केलं आहे.
"माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. नाहीतर पुढे काय घडले तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करू नका. आम्हीही तुमची वाट पाहातोय", अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसैनिकांना डिवचलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.