बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमुत्राने शुद्धिकरण करणाऱ्या शिवसेनेवर नितेश राणेंचा प्रहार; म्हणाले, पुढच्या वेळी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 08:43 AM2021-08-20T08:43:35+5:302021-08-20T08:45:01+5:30
Nitesh Rane Criticize Shiv Sena : नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या ठिकाणाचं शुद्धिकरण केलं होतं. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
मुंबई - केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून केली होती. (Nitesh Rane Criticize Shiv Sena)दरम्यान, नारायण राणे बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाला भेट देऊन निघून गेल्यानंतर शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून या ठिकाणाचं शुद्धिकरण केलं होतं. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. शुद्धिकरण करायचंच असेल तर आता ते शिवसेनेचं करावं लागेल, अशी टीका या घटनेनंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली होती. तर आता बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धिकरण करणाऱ्या शिवसेनेला नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनीही शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. (Nitesh Rane Criticize Shiv Sena purifying Balasaheb's memorial with Gomutra )
शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या स्मारकाचं गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण केल्यानंतर नितेश राणे यांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले की, ‘’अडवण्याची भाषा करणारे गोमुत्रावर आले आहेत. म्हणून पुढच्यावेळी चड्डीत राहायचं.’’ आता नितेश राणेंच्या या ट्विटला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागेल.
अडवण्याची भाषा करणारे..
— nitesh rane (@NiteshNRane) August 19, 2021
गोमूत्र वर आले..
म्हणून पुढच्या वेळी..
चड्डीत राहायचं !!
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, अशुद्ध आणि शुद्ध असा भेदभाव करणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरेंना मानणाऱ्या पक्षाची आहे. ही विदारक स्थिती आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीची झाली आहे. ती जागा काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नाही. ती मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जागी कुणी जायचं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शुद्धीकरण करायचं असेल तर शिवसेनेचं करावं लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं. त्या छगन भुजबळांसोबत सत्ता स्थापनेसाठी बसायचं. स्वत:च्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला बगल देऊन केलं आहे. या शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. शुद्धीकरणाच्या नावाने नौटंकी करू नये, असा घणाघात देखील आशिष शेलार यांनी केला आहे.
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान, दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. "साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि म्हणाले असते नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असं मी समजतो", असं नारायण राणे म्हणाले होते.