"नितीन गडकरी हे अयोग्य पक्षात असलेले योग्य व्यक्ती’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:42 AM2021-05-31T11:42:16+5:302021-05-31T12:09:05+5:30
Nitin Gadkari News: सध्याच्या काळात मोदींऐवजी गडकरींकडे पंतप्रधानपद सोपवण्यात यावे, असे म्हणणाऱ्यांचीही कमी नाही. दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने आता नितीन गडकरींच्या कार्यशैलीचे उघडपणे कौतुक केले आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे अनेकजण नितीन गडकरी (Nitin Gadkari ) हे पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे सोशल मीडियावरून उघडपणे सांगत आहेत. तसेच सध्याच्या काळात मोदींऐवजी गडकरींकडे पंतप्रधानपद सोपवण्यात यावे, असे म्हणणाऱ्यांचीही कमी नाही. दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने (Congress) आता नितीन गडकरींच्या कार्यशैलीचे उघडपणे कौतुक केले आहे. ("Nitin Gadkari is the right person in the wrong party", praised by senior Congress leader Ashok Chavan)
काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले आहे. नितीन गडकरींबाबत भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले की, नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांबाबत गांभीर्याने विचार करतात. मी लेखाच्या माध्यमातून तसेच ट्विटरवरून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मात्र याचा अर्थ मी त्यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करतो, असा होत नाही. नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती आहेत, असे खोचक कौतुकही अशोक चव्हाण यांनी केले.
Nitin Gadkari takes issues related to basic amenities & infrastructure in Maharashtra seriously. I praise his work either by writing articles or on Twitter. This doesn't mean that I support his political stand. He's right person in wrong party: Maharashtra Min Ashok Chavan (30.5) pic.twitter.com/54v7XizKVI
— ANI (@ANI) May 31, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून आपल्या कारकीर्दीची ७ वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. दरम्यान, गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. त्यातच देशात दुसरी लाट आल्यानंतर कोरोनाबाबतचे सरकारचे नियोजन फसल्याची टीका केली जात आहे. तसेच देशावरील कोरोनाचे संकट आणि लसीकरणाचे धोरण फसल्याने त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरण्यात येत आहे.
दुसरीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांचे कौतुक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अशोक चव्हाण यांनी केलेले नितीन गडकरींचे कौतुक हे चर्चेचा विषय ठरले आहे.