"नितीशकुमार व भाजपाला यंदा मोठे आव्हान"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:40 AM2019-01-24T05:40:28+5:302019-01-24T05:40:47+5:30

भाजपाला पुन्हा केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी जी राज्ये महत्त्वाची आहेत, त्यात बिहारचा समावेश होतो, कारण या राज्यांतून तब्बल ४0 खासदार निवडून येतात.

"Nitish Kumar and BJP have a big challenge this year" | "नितीशकुमार व भाजपाला यंदा मोठे आव्हान"

"नितीशकुमार व भाजपाला यंदा मोठे आव्हान"

Next

लखनऊः भाजपाला पुन्हा केंद्रातील सत्ता मिळवण्यासाठी जी राज्ये महत्त्वाची आहेत, त्यात बिहारचा समावेश होतो, कारण या राज्यांतून तब्बल ४0 खासदार निवडून येतात. त्यापैकी ३१ जागांवर गेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपा व मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आले होते. एकट्या भाजपाला २२ जागांवर विजय मिळाला होता, तर रामविलास पासवान यांच्या पक्षाला ६ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टी यांचे ३ उमेदवार निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व नितीश कुमार यांचा जनता दल (संयुक्त) एकत्र होते आणि तिघांना मिळून ९ जागा जिंकता आल्या होत्या.
पण मधल्या काळात बरेच बदल राज्यात होत गेले. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांत लालू यादव यांचा राजद, नितीशकुमारांचा जेडीयू, काँग्रेस यांनी बाजी मारली. या तिन्ही पक्षांनी मिळून राज्यातील सत्ता मिळवली. नितीशकुमार यांनी राजद, काँग्रेस व मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार बनवले. त्यावेळी नितीशकुमार यांच्या पक्षाला ६९, तर राजदला ७९ जागा होत्या आणि काँग्रेसचे आमदार होते २७. तरीही दोघांनी नितीशकुमार यांना पाठिंबा दिला.
पण अचानक नितीशकुमार यांनी लालू व काँग्रेस यांची साथ सोडली आणि भाजपाप्रणित रालोआच्या तंबूत ते शिरले. त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद शाबूतच राहिले. तेव्हाच्या वाऱ्याचा कल पाहूनच त्यांनी भाजपाशी घरोबा केला, हे स्पष्ट दिसत होते.
पण हिंदुस्थान अवाम पार्टीचे जीतनराम मांझी यांचा पक्ष विरोधी आघाडीत आला. केंद्रात राज्यमंत्री असलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे सर्वेसर्वा उपेंद्र कुशवाह यांनी रालोआ आणि भाजपाची संगत सोडून विरोधकांच्या आघाडीचा रस्ता धरला. भाजपाविरोधी वातावरण तयार होत असल्याचे दिसत असल्यानेच कुशवाह यांनी हा निर्णय घेतला.
आता लोकसभा निवडणुकांसाठी तेजस्वी यादव जोरात कामाला लागले आहेत. लालू यादव यांचे दुसरे पुत्र तेजप्रताप यादव हे भरवशाचे नाहीत. पण राष्ट्रवादीचे नेते व बिहारमधून त्या पक्षातर्फे निवडून आलेले एकमेव खा. तारीक अन्वर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, तेही सध्या सभा घेत आहेत. राजद व काँग्रेसचे कार्यकर्तेही जोमात आहेत.
दुसरीकडे गेल्या काही काळात नितीशकुमार यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. सत्ताधारी पक्षाविषयी अशी नाराजी लवकरच होते. त्यात नितीशकुमार यांनी घरोबा बदलल्याचा राग लोकांमध्ये आहे. दारूबंदीमुळे राज्याचे उत्पन्न घटले आणि मद्यपीही चिडले आहेत. बिहारमध्ये जातीचे राजकारण व समीकरण जोरात चालते. आता जीतनराम मांझी यांच्यामुळे दलित, उपेंद्र कुशवाह यांच्यामुळे कुर्मी तसेच अन्य मागास जाती, राजदमुळे यादव व मुस्लीम आदींचे समीकरण जुळून येताना दिसत आहे. काँग्रेसची अद्यापही पारंपरिक व्होट बँक असून, ती मते या आघाडीलाच जातील, असा अंदाज आहे.
मात्र भाजपा व नितीशकुमार हेही कामाला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर व्यासपीठावर बसणार नाही, हा पण नितीशकुमार लवकरच मोडणार असून, राज्यात त्यांच्या एकत्र सभा होणार आहेत. भाजपा नेते व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करून बुथनिहाय कार्यकर्त्यांना काम आखून दिले आहे. संघटनात्मकदृष्ट्या भाजपाच बिहारमधील सर्वात बळकट पक्ष आहे. तशी संघटना अन्य एकाही पक्षाकडे नाही. पण जातीचे राजकारण जमले की मग सारे एकत्र येतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाची लढाई संघटनात्मक ताकद विरुद्ध जातींचे समीकरण अशीच दिसत आहे. त्यात जातींचे समीकरण सध्या तरी वरचढ दिसते.
>दोन सिन्हा ठरले अडचणीचे
बिहारच्या पाटणासाहिब मतदारसंघातून तीनदा निवडून आलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा भाजपाशी केवळ अधिकृत काडीमोड होणे बाकी आहे. त्यांनी पाटणासाहिबमधूनच विरोधकांच्या आघाडीतर्फे उभे करावे, असा प्रयत्न आहे. भाजपाशी काडिमोड घेतलेले आणखी एक मोठे नेते म्हणजे यशवंत सिन्हा. तेही बिहारचे आहेत. दोन सिन्हांमुळे बिहारमधील कायस्थ समाज भाजपाविरोधात जाईल, असे बोलले जात आहे.

Web Title: "Nitish Kumar and BJP have a big challenge this year"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.