फिरसे एक बार नितीश सरकार! सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार; उद्या शपथविधी

By कुणाल गवाणकर | Published: November 15, 2020 02:04 PM2020-11-15T14:04:39+5:302020-11-15T14:24:02+5:30

नितीश कुमार सातव्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

Nitish Kumar returns as Bihar chief minister gets NDA nod at key meeting | फिरसे एक बार नितीश सरकार! सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार; उद्या शपथविधी

फिरसे एक बार नितीश सरकार! सातव्यांदा हाती घेणार बिहारचा कारभार; उद्या शपथविधी

Next

पाटणा: संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहेत. उद्या सकाळी कुमार यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल. नितीश कुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजप नेते सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मोदी याआधीच्या मंत्रिमंडळातही उपमुख्यमंत्री होते. आज पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.




सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आज पाटण्यात एनडीएची महत्त्वाची बैठक झाली. तत्पूर्वी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाली. दुसऱ्या बाजूला भाजप नेते आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर जेडीयू आणि भाजपच्या नेत्यांची संयुक्त बैठक झाली. त्यात नितीश कुमार हेच एनडीए सरकारचे मुख्यमंत्री असतील, यावर शिक्कामोर्तब झालं.

भाजप नितीश कुमारांना 'धोबीपछाड' देणार?; 'त्या' बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष

पाटण्यात झालेल्या एनडीएच्या बैठकीला एनडीएतील चारही पक्षांचे (जेडीयू, भाजप, हम, व्हीआयपी) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. नितीश यांचा शपथविधी उद्या संपन्न होईल. नितीश यांच्या मंत्रिमंडळात याआधी काम केलेल्या अनेक मंत्र्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी साडे अकरा ते साडे तीनच्या दरम्यान शपथविधी सोहळा आयोजित करण्यात येईल.

‘’भाजपा ईव्हीएमचा गैरवापर करतो, बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास ‘औकात’ दिसेल’’

भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष
भाजपनं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजप एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं पहिल्यांदाच जेडीयूपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे आता भाजप युतीमधील मोठा भाऊ ठरला आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत ४३ जागा मिळाल्या आहेत. मात्र तरीही सरकारचं नेतृत्त्व नितीश कुमारच करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेतृत्त्वानं स्पष्ट केलं आहे.

कंदील, कमळ आणि बिहारचे महाराष्ट्र कनेक्शन

नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.

Web Title: Nitish Kumar returns as Bihar chief minister gets NDA nod at key meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.