Nitish Kumar: “सातवी बार, फिर नितीश कुमार”; बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा घेतली शपथ
By प्रविण मरगळे | Published: November 16, 2020 05:08 PM2020-11-16T17:08:28+5:302020-11-16T17:11:04+5:30
Bihar Result, RJD, CM Nitish Kumar oth ceremony News: बिहारच्या २४३ जागांपैकी एनडीएच्या खात्यात १२५ तर महाआघाडीच्या खात्यात ११० जागा आल्या. यंदा एनडीएत भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या
पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार हे बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये एनडीएला १२५ जागांचे बहुमत मिळालं असून आज झालेल्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
बिहारच्या २४३ जागांपैकी एनडीएच्या खात्यात १२५ तर महाआघाडीच्या खात्यात ११० जागा आल्या. यंदा एनडीएत भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या. त्यापाठोपाठ जेडीयूला ४३, मुकेश साहनी यांच्या वीआयपीला ४, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाला ४ जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून भाजपाचे कटिहारचे आमदार तारकिशोर प्रसाद आणि बेतियाचे आमदार रेणू देवी यांनी शपथ घेतली.
#WATCH: Nitish Kumar takes oath as the Chief Minister of Bihar for the seventh time - his fourth consecutive term. pic.twitter.com/5jcZXabSYw
— ANI (@ANI) November 16, 2020
Patna: Bharatiya Janata Party (BJP) leaders Tarkishore Prasad and Renu Devi take oath as the Deputy Chief Ministers of Bihar. pic.twitter.com/60kHuDDzOC
— ANI (@ANI) November 16, 2020
शपथविधी सोहळ्याला आरजेडीचा बहिष्कार
राष्ट्रीय जनता दल शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. निवडणुकीत जनतेने सरकार बदलण्यासाठी मतदान केले होते, जनादेशाला शासनादेशामध्ये बदलण्यात आले. बिहारच्या बेरोजगार, शेतकरी, कर्मचारी आणि शिक्षकांची अवस्था काय झाली, त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं हे विचारावं. एनडीएच्या फसवणुकीमुळे जनतेत आक्रोश आहे. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि जनतेसोबत कायम राहू असं आरजेडी नेत्यांनी सांगितले
नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.
महाआघाडीत वादाची ठिणगी
महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती असं आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे अशी नाराजी काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा यांनी शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली.