नारायण राणे मंत्री असले तरी निर्णय मोदींनाच विचारून घ्यावे लागतील; एकनाथ शिंदे यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 08:28 AM2021-08-23T08:28:43+5:302021-08-23T08:29:38+5:30
केंद्रात मंत्री असतानाही धोरणात्मक निर्णय घेताना नारायण राणे यांनाही पंतप्रधानांचीच संमती घेऊनच तो घ्यावा लागेल. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारेच आहे, असे शिंदे यांनी म्हटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असून, ते केवळ सह्यांचेच मंत्री आहेत, असा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर नगरविकास खात्यात किंवा आपल्या कामामध्ये मातोश्रीवरून कोणताही हस्तक्षेप होत नसल्याचा दावा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला आहे. समाजमाध्यमांद्वारे त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्ती केली आहे.
केंद्रीयमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. यादरम्यान त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असल्याचा आरोप करीत त्यांना आपण भाजपमध्ये घ्यायला तयार असल्याचेही राणे यांनी म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी मातोश्रीवरून अर्थात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होणाऱ्या हस्तक्षेपाचा आरोप फेटाळून लावला. परंतु धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल त्यावेळी नगरविकासच नाही तर कोणत्याही खात्याचा निर्णय हा मुख्यमंत्री यांच्याच संमतीने मंत्रिमंडळाला घ्यावा लागतो. याची युतीच्याच काळात स्वत: मुख्यमंत्री राहिलेल्या राणे यांनाही जाणीव असल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला. आता केंद्रात मंत्री असतानाही धोरणात्मक निर्णय घेताना राणे यांनाही पंतप्रधांनांचीच संमती घेऊनच तो घ्यावा लागेल. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे संभ्रम निर्माण करणारेच आहे, असे शिंदे यांनी म्हटले.
आपल्या विभागात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शिवाय, हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गही यशस्वीपणे आपण पुढे नेत आहोत. त्यामुळेच आपल्या कामात, विभागात मातोश्रीचे किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करण्याचे काम झाले आहे. कोविडकाळात आणि आताही सर्व प्रकारच्या विकासकामात कुठेही मुख्यमंत्र्यांनी कात्री लावलेली नाही. अनेक प्रकल्प महाविकास आघाडी पुढे नेत असून, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी चांगले काम करीत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
एकनाथ शिंदेच नाही, तर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री नाराज - चंद्रकांत पाटील
nमुंबई : नारायण राणे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल त्यांनी केलेले विधान त्यातूनच आले आहे. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची स्थितीही शिंदे यांच्यासारखीच आहे. मंत्रिपदामुळे लाल दिवा, केबिनमध्ये, कर्मचाऱ्यांचा ताफा मिळाला असला तरी निर्णय दुसरेच घेतात, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली आहे.
nभाजप प्रदेश कार्यालयात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केले. एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशा आशयाचे विधान नारायण राणे यांनी केले होते. यासंदर्भात चंद्रकांत पाटील म्हणाले की, राणे हे नव्याने भाजपमध्ये आले असले तरी त्यांचा अनुभव दांडगा आहे.
nज्या शिवसेनेतून त्यांचा उदय झाला त्या शिवसेनेबद्दल आणि ठाकरे कुटुंबीयांबद्दल त्यांची परखड मते ते मांडतात. ते म्हणतात तशी जर शिंदे यांची स्थिती असेल, तरी ती त्यांची एकट्याची स्थिती नाही. केवळ सह्या करण्याचे काम मंत्र्यांकडे उरले आहे. रिमोट कंट्रोल अन्य ठिकाणी आहे, असे ते म्हणाले.
nआघाडी सरकार किती काळ चालेल, याची कल्पना नाही. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष वेगवेगळे लढले किंवा एकत्र लढले तरीही भाजपचाच विजय होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुटे सुटे लढल्याने महाविकास आघाडीची वाताहत होईल आणि त्यानंतर ते एकत्र राहतील असे नाही. मात्र, आम्ही पुढील निवडणुका या स्वबळावरच लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
nमराठा आरक्षणासाठी जे जे नेते आंदोलन करतील त्या सर्वांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. ही आमची भूमिका आहे.
आरक्षणाबाबत संभाजी राजे हे राज्य सरकारची भूमिका समजून घेत आहेत असे म्हणणारे आता नांदेडचे आंदोलन
भाजप पुरस्कृत असल्याचे म्हणत आहेत.
nआरक्षणासाठी कुठलेही पाऊल न उचलता
संभाजीराजांनी आंदोलन करू नये, असे सरकार कसे म्हणू शकते, असा प्रश्नही त्यांनी केला.