संजय राऊतांच्या भेटीबद्दल पहिल्यांदाच बोलले फडणवीस; मुलाखतीसाठीच भेटलो, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 02:19 PM2020-09-27T14:19:04+5:302020-09-27T14:24:10+5:30
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू
मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकारचं आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल जोरदार चर्चा झाली. या बैठकीबद्दल आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत यांना 'सामना'साठी माझी मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी ही बैठक झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. त्याआधी संजय राऊत यांनीदेखील अशाच प्रकारचं स्पष्टीकरण दिलं.
Sanjay Raut ji wanted to take my interview for Shiv Sena's newspaper Saamana. The meeting was held to discuss the same as I had put certain conditions, I wanted it to be published unedited. No political talks held in meeting: Devendra Fadnavis, Former Maharashtra CM & BJP leader https://t.co/AuRcCtSOXUpic.twitter.com/2BabKfCXAU
— ANI (@ANI) September 27, 2020
'शिवसेना नेते संजय राऊत यांना सामनासाठी माझी मुलाखत घ्यायची आहे. त्यांनी त्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. त्यावर मी जरूर मुलाखत देईन असं त्यांना म्हटलं. पण माझ्या काही अटी, शर्ती आहेत. मुलाखत घेताना तिथे माझाही कॅमेरा असेल, अशा माझ्या काही अटी, शर्टी आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी एकदा भेटून बोलू असं ठरलं होतं. त्याविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो घेतो,' असं फडणवीस म्हणाले.
मुलाखतीच्या आड राजकारण; फडणवीस-राऊत भेटीने भूकंप
भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही, हे सरकार स्वत:च्या कृतींमुळेच कोसळेल, या विधानांचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 'संजय राऊत यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याबद्दल भाजपची कुठलीही चर्चा नाही. तशी चर्चा करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारच्या कामाबद्दल जनतेच्या मनात आक्रोश आहे. विरोधी पक्ष म्हणून सरकारला धारेवर धरण्याचं काम आम्ही करत आहोत. हे सरकार आपल्या स्वत:च्या कृतीनं खाली कोसळेल. त्यावेळी काय करायचं ते तेव्हा बघू. सरकार स्थापनेची आम्हाला कुठलीही घाई नाही,' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
फडणवीस-राऊत भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान;"हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पण..."
संजय राऊत भेटीबद्दल काय म्हणाले?
आमच्या भेटीमध्ये गोपनीय असे काही नव्हते. गोपनीय भेट म्हणायला आम्ही काही बंकरमध्ये तर भेटलेलो नाही. या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली. बाकी गोपनीय म्हणायचं तर आम्ही गोपनीय पद्धतीनं भोजन केलं, असा चिमटा राऊत यांनी काढला. एकमेकांना न भेटायला आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक वाद होतात. पण वैयक्तिक वाद होत नाहीत. सत्ताधारी विरोधक भेटतच असतात. भाजपासोबत सत्तेत असताना मी शरद पवार यांना भेटायचो. आजही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपले नेते मानतो, असे संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात झाली होती २ तास गुप्त बैठक
सांताक्रुझच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये काल दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाली होती. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी काय चर्चा केली याबाबत खुलासा झाला नव्हता. मात्र या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नव्याने काही हालचाली सुरु झाल्यात का? या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी एक शायरी ट्विट केली होती, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "किसी भी रिश्ते को कितनी भी ख़ूबसूरती से क्यों ना बाँधा जाए...अगर नज़रों में इज़्ज़त और बोलने में लिहाज़ ना हो तो वह टूट जाता है" त्यामुळे संजय राऊत यांना नेमका कोणाबाबत हा संदेश द्यायचा आहे या प्रश्न आहे. मात्र आजच्या बैठकीने हे संकेत दिलेत का अशीही चर्चा आहे.