ठाकरे सरकारने सद्सदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? देवेंद्र फडणवीस कडाडले
By मोरेश्वर येरम | Published: November 27, 2020 03:47 PM2020-11-27T15:47:59+5:302020-11-27T15:53:16+5:30
आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. याचा विसर या राज्य सरकारला पडला असल्याची फडणवीसांनी टीका केलीय.
मुंबई
अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई अवैध ठरवल्याच्या न्यालयाच्या निर्णयाचं स्वागत करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
''एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकाप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारे आहेत. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्ध हे महाराष्ट्रद्रोही ठरविणार का?'', असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन न देणं चूक असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने आज कंगना राणौतच्या कार्यालयावरील महापालिकेची कारवाई अवैध असून नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिले. न्यायालयाच्या या दोन्ही निकालांवरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
''आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलीस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, ते छळवणुकीसाठी नाहीत. हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेकबुद्धी- संविधानाला स्मरुन घेतलेली शपथ गहाण ठेवली का? हा प्रश्न निर्माण होतो", असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.
सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 27, 2020
सरकारविरोधी आवाज दाबता येत नाही
"सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडील काळात महाराष्ट्रात घडल्या, त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशाप्रकारे चिरडून टाकता येत नसतो, हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे'', असंही रोखठोक मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.