निवडणुकीचे तिकीट नाही दिले, भाजपा कार्यकर्त्याने नेत्याला झाडाला बांधून घातले
By बाळकृष्ण परब | Published: November 10, 2020 08:08 AM2020-11-10T08:08:03+5:302020-11-10T08:09:49+5:30
Panchayati Raj elections News : निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका भाजपा कार्यकर्त्याने स्थानिक नेत्यालाच दोरीने झाडाला बांधून ठेवल्याची घटना घडली आहे.
नागौर - निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यास अनेकदा कार्यकर्ते आक्रमक होतात. काही ठिकाणी बंडखोरी होते. आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले जाते. मात्र राजस्थानमधील नागौरमध्ये पंचायत राज निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका भाजपा कार्यकर्त्याने स्थानिक नेत्यालाच दोरीने झाडाला बांधून ठेवल्याची घटना घडली आहे. बराच वेळ चाललेल्या वादविवादानंतर या नेत्याची सुटका करण्यात यश मिळाले. मात्र हा गोंधळ स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केल्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे भाजपावर नामुष्की ओढवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील नागौर येथील भौरुंदा मंडल परिसरात ही घटना घडली. येथे नाराज भाजपा कार्यकर्त्यांनी मंडल अध्यक्ष राजेंद्र वैष्णव आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांना झाडाला बांधून घातले. तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून खडेबोल सुनावले. पंचायत राज निवडणुकीसाठी तिकीट वाटप योग्य पद्धतीने केले गेले नाही, असे नेत्यांना सांगितले. या संपूर्ण प्रकाराचे फोटो काढले गेले. तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर फिरवले गेले.
अखेरीस काही जणांनी मध्यस्थी करत कार्यकर्ते आणि नेत्यांमधील तणाव शांत केला. त्यानंतर राजेंद्र वैष्णव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मुक्तता करण्यात आली. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.
राजस्थानमध्ये पंचायत राज संस्थांची निवडणूक होत आहे. ही निवडणूक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये चार टप्प्यात होणार आहे. काल या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. दरम्यान जा निवडणुकीत गटबाजीमुळे अनेक ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती.