नुसतं अयोध्येत जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत - नवाब मलिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 08:59 PM2021-01-29T20:59:54+5:302021-01-29T21:01:51+5:30
Nawab Malik : नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.
शुक्रवारी नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी त्यांना विचारण्यात आले असता, प्रत्येकाला आपापली आस्था जपण्याचा अधिकार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा अन्य कुठलेही नेते असोत प्रत्येकाची आस्था असते. या देशात प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. हा प्रत्येक नागरिकाचा मौलिक अधिकार आहे. त्यामुळे ते त्यांना हवे, त्याठिकाणी जाऊ शकतात, असे नवाब मलिक म्हणाले.
याचबरोबर, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाचवेळी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने आता राज्यात पुन्हा एकदा मनसे आणि भाजपाच्या युतीची चर्चा सुरु झाली आहे. याविषयी भाष्य करताना नवाब मलिक यांनी कोणी कोणासोबत युती करावी, हा त्यांचा अधिकार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
मी स्वतः अयोध्येला जाणार - देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे. प्रभू राम हे सर्वांचे आराध्य दैवत आहे आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटून आता तिथे भव्य राम मंदिर उभारले जात आहे. त्यामुळे सर्वांनीच अयोध्येला जायला हवे. मी स्वतः अयोध्येला जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(अयोध्येतील राम मंदिरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक लाख रुपयांची देणगी; म्हणाले...)
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले...
"राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू", असं संजय राऊत म्हणाले
राज्यात भाजपा- मनसे युती ?
राज्यात भाजपाशी फारकत घेतल्यानंतर शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची टीकाही वेळोवेळी होत आहे. याच गोष्टीचा फायदा उचलत मनसेने हिंदुत्वाकडे वाटेने मार्गक्रमण सुरु केले आहे. त्याचवेळी भाजपा आणि मनसेची एकत्र येण्याच्या चर्चांना देखील मोठे उधाण आहे .