आता नाही तर कधीच नाही! सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांचा राजकीय पक्ष जानेवारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 02:42 AM2020-12-04T02:42:24+5:302020-12-04T02:43:13+5:30
रजनीकांत यांना भाजप पडद्यामागून मदत करत आहे. ते म्हणाले, रजनीकांत यांनी त्यांचा राजकीय पक्ष, त्याचे प्रत्यक्षातील उपक्रम यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम आर. अंजनामूर्ती आणि तमिलारूविमानियन यांना सांगितले.
चेन्नई : तामिळ चित्रपट अभिनेते रजनीकांत हे येत्या जानेवारी महिन्यात त्यांचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. या पक्षाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. राज्यात जून महिन्यात विधानसभा निवडणूक आहे.
‘आश्चर्य आणि चमत्कार’ मी घडवीन आणि जात किंवा धर्म नसलेले आध्यात्मिक धर्मनिरपेक्ष राजकारण आणीन, असे रजनीकांत यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. विधानसभा निवडणूक आम्ही नक्की जिंकू आणि प्रामाणिक, पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्त, जात किंवा वंश वा धर्माचा संबंध नसलेले आध्यात्मिक धर्मनिरपेक्ष राजकारण देऊ. आश्चर्य आणि चमत्कार निश्चितपणे घडेल.
असे रजनीकांत यांनी ट्विटरवर म्हटले. त्याला त्यांनी आता नाही तर कधीच नाही, असा टॅग लावला आहे. आम्ही बदलू, आम्ही प्रत्येक गोष्टी बदलू, असेही ते त्यात म्हणाले. वार्ताहरांशी बोलताना रजनीकांत म्हणाले, “तामिळ लोकांसाठी मी माझ्या आयुष्याचाही त्याग करायला तयार आहे. आता नाही तर कधीच नाही.”
भाजपची मदत
काँग्रेसचे खासदार कार्ती चिदम्बरम म्हणाले की, रजनीकांत यांना भाजप पडद्यामागून मदत करत आहे. ते म्हणाले, रजनीकांत यांनी त्यांचा राजकीय पक्ष, त्याचे प्रत्यक्षातील उपक्रम यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम आर. अंजनामूर्ती आणि तमिलारूविमानियन यांना सांगितले.