राजकारण नव्हे, शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय; प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना उपरोधिक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 05:23 PM2021-06-13T17:23:11+5:302021-06-13T17:23:39+5:30
राजकारण हे चंचल असतं त्यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीचे आडाखे तुम्ही काही आत्ताच बांधू शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं.
राजकारण हे चंचल असतं त्यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीचे आडाखे तुम्ही काही आत्ताच बांधू शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केलं. त्यावर आता राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राजकारण हे कधीच चंचल नसतं, राजकीय नेते हे चंचल असतात. शिवसेनेची विचारधारा आता चंचल झालीय, अशी उपरोधिक टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"संजय राऊत बोलतात त्याप्रमाण राजकारणात घडत नाही. राजकारण कधीच चंचल नसते. राजकीय नेते हे चंचल असतात. पण आपली वैचारिक भूमिका आणि विचारधारा ही चंचल नसावी. शिवसेनेच्याबाबतीत हिच गोष्ट घडत आहे. संजय राऊत यांनी याचा विचार करावा", असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची नुसती टोलवाटोलवी सुरू असल्याचंही दरेकर यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणाचा विषय आता मोदींच्या हातात असल्याच्या संजय राऊत यांच्या विधानावर ते बोलत होते.
५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री ही 'कमिटमेंट'
राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी संदर्भातील वावड्यांबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनेचाच ५ वर्ष मुख्यमंत्री राहिल. त्यात ना कोणता वाटा किंवा घाटा होणार नाही. तशी कमिटमेंटच सुरूवातीला दिली गेली आहे, असं संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. त्यावर प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला यावेळी लगावला आहे.